मुंबई बत्तीगुल प्रकरण : चौकशीसाठी तांत्रिक लेखापरीक्षण समितीला मुदतवाढ

मुंबई बत्तीगुल प्रकरण : चौकशीसाठी तांत्रिक लेखापरीक्षण समितीला मुदतवाढ

मुंबई, ता. 27:  मुंबई आणि MMR परिसरामध्ये 12 ऑक्टोबरला वीजपुरवठा खंडित घटना ही घातपात असण्याची शक्यता व्यक्त करत उर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी नियुक्त केलेल्या समितीने सात दिवसांच्या कालावधीत तातडीने अहवाल सादर करण्यास असमर्थतता दर्शवली आहे. या समितीला राज्य सरकारला आता 5 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी लागली आहे.

12 ऑक्टोबरला झालेल्या वीजपुरवठा खंडित घटनेची चौकशी तसेच तांत्रिक लेखापरिक्षण करुन उपाययोजना सुचविण्यासाठी तांत्रिक/लेखापरीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. 

12 ऑक्टोबररोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई क्षेत्रात तसेच उपनगरीय रेल्वेचा वीज पुरवठा खंडीत झाला होता. हा वीज पुरवठा खंडीत होण्यामागे नेमकी काय कारणे आहेत आणि अशा घटना भविष्यात होऊ नये याकरिता कोणत्या उपाय योजना राबविणे आवश्यक आहे, याचा सर्वकष अभ्यास करण्यासाठी आयआयटी मुंबईचे विद्युत अभियांत्रिकी शाखा विभाग प्रमुख प्रा. बी. जी. फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे.

सात दिवसांमध्ये या समितीला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले होते. या समितीमधील सर्व सदस्य हे वीज क्षेत्राशी निगडित असून काही सदस्य विद्युत अभियांत्रिकी अध्ययन क्षेत्रातील तर काही सदस्य प्रत्यक्ष कामाशी संबधित असलेले आहेत.

या घटनेतील वीजपुरवठा खंडित होण्यामागील कारणांची चौकशी आणि तांत्रिक लेखापरीक्षण करणे; ग्रीड बंद पडण्यामुळे वीजनिर्मिती केंद्रे, वीजेची रिसिव्हींग स्टेशन्स, इंटरकनेक्टिंग ट्रान्सफॉर्मर्स (आयसीटी) / बस, वीजवाहिन्या बंद पडण्यामागील घटनाक्रम आणि वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी झालेले प्रयत्न; टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे आयलँडिंग सुरू न होऊ शकल्याची कारणे, 400 केव्ही लाईनवर मुंबईतील वीजेच्या आवश्यकतेनुसार आऊटेज घेण्याची कारणमिमांसा व त्याकरिता अवलंबलेली कार्यपद्धती; घटनेच्या वेळचा कळवा येथील राज्य भार वितरण केंद्राचा (एसएलडीसी) प्रतिसाद आणि अवलंबलेली कार्यपद्धती; घटनेच्या अनुषंगाने एसएलडीसी आणि अन्य यंत्रणांमधील समन्वय साधला गेला होता का? तसेच एसएलडीसीच्या वर्तमान कार्यपद्धती (प्रोटोकॉल) मध्ये सुधारणा सुचविणे; भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी उपाययोजना सुचविणे आदींच्या अनुषंगाने या समितीकडून काम होणे अपेक्षित आहे.

समितीमध्ये नागपूर व्ही.एन.आय.टी. मधील विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक डॉ. एम. व्ही. आवारे, व्हि.जे.टी.आय., मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. फारुख काझी, महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ सूत्रधार कंपनीचे सल्लागार उत्तम झाल्टे, मुख्य विद्युत निरीक्षक दिनेश खोंडे, आयआयटी मुंबईच्या विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्रा. एस. ए. सोमण सदस्य तर महावितरणचे संचालक (संचलन) सतीश चव्हाण हे सदस्य सचिव असणार आहेत. आयआयटी पवईतील विद्युत अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक अनिल कुलकर्णी हे या समितीचे निमंत्रित सदस्य आहेत.

power cut in mumbai Extension of time to Technical Audit Committee for inquiry

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com