ईव्हीएमविरोधात न्यायालयात जणार - प्रकाश आंबेडकर 

सकाळ न्यूज नेटवर्क 
शनिवार, 8 जून 2019

 ईव्हीएम मशीनमधील अफरातफर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

मुंबई - ईव्हीएम मशीनमधील अफरातफर आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. ईव्हीएम मशीनबाबत संशय व्यक्त करत झालेले मतदान आणि मतमोजणीचे आकडे यातील तफावत समोर आणण्यासाठी त्यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. 

आंबेडकर म्हणाले की, लोकसभेच्या सर्व 48 मतदारसंघांमध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यांमध्ये तफावत आढळून आली. 24 मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे आणि उर्वरित 24 मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या ही मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे. एक-दोन ठिकाणांचे मोजके अपवाद वगळता यापूर्वी कोणत्याही निवडणुकीमध्ये सर्व मतदारसंघांमध्ये अशा प्रकारची तफावत आलेली नाही. म्हणूनच आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन करतो की, त्यांनी या तफावतीचे 15 दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यावे. आयोगाने याचे स्पष्टीकरण न दिल्यास, वंचित बहुजन आघाडी याविरोधात रस्त्यावर उतरून लढा सुरू करील. आमच्या लढ्याला देशभरातील सर्व राजकीय पक्षांनी साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

"भाजपची बी टीम' संबोधल्याने आंबेडकर संतापले 
वंचित बहुजन आघाडीने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत जायचे की नाही, याचा निर्णय नंतर घेऊ; आधी त्यांनी आमच्या आघाडीला "भाजपची बी टीम' म्हणून संबोधले त्याचा खुलासा करावा, असा संताप आंबेडकर यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मौलानांनी मशिदीतून जे फतवे काढले त्यामुळे मुस्लिम समाजाची मते आमच्या आघाडीला मिळाली नाहीत, असा खुलासा त्यांनी या वेळी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prakash Ambedkar to go to court against EVM