Prakash Mhatre : शिवसेना ठाकरे गटाकडून कल्याण ग्रामीणमध्ये बदल; प्रकाश म्हात्रे यांची उचलबांगडी

पक्ष फुटीनंतर पक्षप्रमुख प्रथमच कल्याण लोकसभा भागात आल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करत ठाकरे गटाची ताकद दाखवून दिली.
Prakash Mhatre
Prakash Mhatresakal

डोंबिवली - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कल्याण लोकसभा मतदार संघात संवाद दौरा करत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. पक्ष फुटीनंतर पक्षप्रमुख प्रथमच या भागात आल्याने पक्षातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत करत ठाकरे गटाची ताकद दाखवून दिली.

या दौऱ्यानंतर मातोश्रीवरुन काही सुत्र हलली आणि अचानक कल्याण ग्रामीणचे उप जिल्हा प्रमुख प्रकाश म्हात्रे यांची पदावरुन उचलबांगडी करुन त्यापदी आता देसाई गावचे मधुकर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात येत असल्याचे पक्षातील वरिष्ठ सांगत असले तरी पक्षश्रेष्ठींनी घेतलेल्या या निर्णयावर अनेक पदाधिकारी नाराज असल्याचे समजत आहे.

विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांची असा निकाल दिला. यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख यांनी त्यांच्या संवाद दौऱ्यास एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यातील त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघातून सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर टिका देखील केली. पक्ष फुटीनंतर गेल्या दिड वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकदाही कल्याण लोकसभा मतदारसंघात फिरकले नव्हते.

येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची इच्छा असून देखील त्यांनी या मतदारसंघात पाऊल ठेवले नव्हते. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता होती. परंतु विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर त्यांनी ठिकठिकाणी संवाद दौऱ्यास कल्याण लोकसभा मतदार संघातून सुरुवात केली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाकरे यांचे जंगी स्वागत शिवसैनिकांनी ठिकठिकाणी केले.

त्यामुळे एकीकडे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे कल्याण ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे यांचे उपजिल्हाप्रमुख पद त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, चर्चा न करता मातोश्रीवरून काढण्यात आले आहे. या प्रकाराने स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

प्रकाश म्हात्रे हे गेल्या 40 वर्षापासून कल्याण ग्रामीण भागात शिवसेनेचे निष्ठावान सैनिक म्हमून काम करत आहेत. या भागातील शिवसेनेचे संघटन मजबूत ठेवण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. शिवसेनाप्रमुख, जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून डोंबिवली जवळील 27 गावे, मलंगवाडी पट्ट्यात शिवसेनेच्या गावोगावी शिवसेना शाखा काढण्यात प्रकाश म्हात्रे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांच्या पत्नी प्रेमा म्हात्रे यांनी केडीएमसीच्या माजी नगरसेविका आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कल्याण, डोंबिवलीतील अनेक शिवसैनिक शिंदे यांच्या सोबत गेले. पण निष्ठावान शिवसैनिक म्हणून प्रकाश यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाणे नाकारले. म्हात्रे यांंनी शिंदे गटात दाखल व्हावे म्हणून गेल्या दीड वर्षात शिंदे गटाकडून अनेक प्रयत्न केले गेले.

म्हात्रे हे सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष होते. ते अध्यक्ष असल्याने मंदिराच्या कामकाजात अडथळे आणण्याचे प्रयत्न शिंदे गटाकडून करण्यात आले. शेवटी अध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिला.

मागील सात महिन्यांपासून म्हात्रे हे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भेट घालून द्या अशी मागणी करत होते. याविषयी स्थानिक, वरिष्ठ पातळीवरून कोणताही निरोप मिळत नसल्याने म्हात्रे गटात अस्वस्थता होती. नुकताच पक्षप्रमुखांनी या भागाचा धावता दौरा करून शिवसैनिकांना धीर दिला.

उद्धव ठाकरे यांच्या आगमनाने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण असतानाच म्हात्रे यांची उप जिल्हाप्रमुख पदावरुन उचलबांगडी करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख पद आता देसाई गावचे मधुकर पाटील यांना देण्यात आले आहे.

माझ्याकडील पद काढले असले तरी मी नाराज नाही. शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांचा निष्ठावान शिवसैनिक म्हणून काम केले आहे यापुढे ही करणार आहे.

- प्रकाश म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com