प्रमोद घोसाळकर पुन्हा शिवसेनेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी (ता.४) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेनेत प्रवेश केला.

लोणेरे (बातमीदार) : रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी बुधवारी (ता.४) शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवेनेत प्रवेश केला. म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्री एकनाथ शिंदे, दादा भुसे, अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रवेश केला.

खासदार सुनील तटकरे यांचे समर्थक, विद्यमान जिल्हाध्यक्ष घोसाळकर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादी पक्षाला रायगड जिल्ह्यात खिंडार पडली आहे. प्रमोद घोसाळकर हे आधी शिवसेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष होते. त्यांनी तब्बल तीन दशके शिवसेनेसाठी काम केले होते. त्यानंतर घोसाळकर यांचे स्थानिक नेत्यांशी खटके उडायचे. त्यामुळे त्यांनी तीन वर्षांपूर्वीच त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर तटकरेंशी जवळीक साधून जिल्हाध्यक्ष पदही  मिळवले होते. विशेष म्हणजे, स्थानिक कार्यकर्त्यांनाही त्यांचा हा निर्णय पटला नसल्याचे बोलले जात होते. त्यांच्या पुन्हा शिवसेनेत प्रवेशाची बातमी ही सोशल मीडियावरून समजल्याने सर्वांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pramod Ghosalkar Again in Shivesena