विश्‍वविक्रमवीर प्रणव धनावडेला पोलिसांची मारहाण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 डिसेंबर 2016

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्देशानुसार सुभाष मैदानात हॅलिपॅड तयार करण्यात आले आहे. त्याची कल्पना खेळाडूंना देण्यात आली होती. शनिवारी खेळाडूंना तेथे खेळण्यास मनाई केल्यानंतर त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. वेगळा प्रकार घडू नये, यासाठी त्यांना पोलिस ठाण्यात आणले गेले.
- दिलीप सूर्यवंशी, वरिष्ठ निरीक्षक, बाजारपेठ पोलिस ठाणे

कल्याण - केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांच्यासाठी येथील सुभाष मैदानावर तयार करण्यात आलेल्या हॅलिपॅडजवळ खेळल्याच्या मुद्द्यावरून आंतरशालेय स्पर्धेत नाबाद एक हजार धावा करून विश्‍वविक्रम करणाऱ्या प्रणव धनावडेला पोलिसांनी शनिवारी धक्काबुक्की केली. या वेळी आपल्याला मारहाण झाल्याचाही प्रणवचा आरोप आहे. पोलिसांनी मात्र तो फेटाळला आहे.

भंडारी चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत विश्‍वविक्रम करणारा प्रणव आणि त्याचे सहकारी सुभाष मैदानातील नेटमध्ये नियमित सराव करतात. एका कार्यक्रमासाठी रविवारी कल्याणमध्ये येणाऱ्या जावडेकर यांच्यासाठी या मैदानात हॅलिपॅड उभारण्यात आले आहे. प्रणव आणि त्याचे सहकारी शनिवारी मैदानावर सराव करत असताना तेथे आलेल्या पोलिसांनी त्यांना तेथून जाण्यास सांगितले. त्यावर आम्ही येथे खेळण्यासाठी पैसे देतो; मग आम्हाला येथे खेळण्यास मनाई का, असा प्रश्‍न प्रणवने पोलिसांना केला. अन्य खेळाडू व स्थानिकांनीही प्रणवला पाठिंबा दिला. त्यानंतरही पोलिसांनी भूमिका कायम ठेवल्याने बाचाबाची झाली. पोलिसांनी प्रणवला शिवीगाळ व धक्काबुक्की करत जबरदस्तीने गाडीत बसवून बाजारपेठ पोलिस ठाण्यात नेले. तेथे असलेल्या प्रणवच्या वडिलांनाही पोलिसांनी गाडीत बसवले.

ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. माहिती मिळाल्यावर शिवसेनेचे नेतेही पोलिस ठाण्यात गेले. त्या वेळी पोलिस प्रणव व त्याच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत होते. राजकीय हस्तक्षेपानंतर हे प्रकरण शांत झाले.

Web Title: Pranav Dhanawade, the record-making cricketer, detained by police