कर्नल प्रसाद पुरोहितची याचिका मंजूर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

मुंबई - मालेगावमध्ये 10 वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारी प्रमुख आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी मंजूर केली.

मुंबई - मालेगावमध्ये 10 वर्षांपूर्वी झालेल्या बॉंबस्फोटाच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याची मागणी करणारी प्रमुख आरोपी कर्नल प्रसाद पुरोहितची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी मंजूर केली.

उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या निकालामध्ये पुरोहितविरोधातील गुन्हा रद्द करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे विशेष एनआयए न्यायालयानेही पुरोहितविरोधात खटला चालवण्याचे आदेश अभियोग पक्षाला दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुन्हा पुरोहितने दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात याचिका दिली आहे. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यानुसार त्याच्याविरोधात फौजदारी खटला दाखल केला आहे.

अशा प्रकारची तक्रार दाखल करण्यासाठी राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाची पूर्वपरवानगी मिळवणे आवश्‍यक असते; मात्र तपास यंत्रणेने नियमानुसार परवानगी घेतली नसल्याचा दावा पुरोहितने याचिकेत केला आहे. यापूर्वी त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती; मात्र विशेष एनआयए न्यायालयात याबाबत दाद मागण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. एनआयए न्यायालयात दाद मागण्याऐवजी पुरोहितने थेट उच्च न्यायालयात याचिका केली, असा आरोप एनआयएतर्फे करण्यात आला. न्या. रणजित मोरे आणि न्या. अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने आज याचिका सुनावणीसाठी मंजूर केली. याचिकेवर पुढील सुनावणी 16 जुलैला होणार आहे. सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या या बॉंबस्फोटामध्ये सहा जण ठार, तर 100 हून अधिक जखमी झाले होते.

Web Title: prasad purohit petition sanction high court