मोठी बातमी - महाविद्यालयाची वसतिगृहे 'क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 March 2020

खासगी हॉटेलमधील जागा पूर्ण भरल्या असल्याने राज्य सरकारकडून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागामधील विद्यापीठे आणि महाविद्यालयाची वसतिगृहे "होम क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्याने राज्य सरकारतर्फे परदेशातून येणाऱ्या नागरिकांना खासगी हॉटेलमध्ये निगराणीखाली ठेवले जात आहे. आता खासगी हॉटेलमधील जागा पूर्ण भरल्या असल्याने राज्य सरकारकडून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या भागामधील विद्यापीठे आणि महाविद्यालयाची वसतिगृहे "होम क्वारंटाईन'साठी आरक्षित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठांकडून वसतिगृहाची माहिती मागवली आहे. 

मोठी बातमी - मुंबई, नवी मुंबईचे प्रदूषण, एका दिवसात निम्म्याने घटले... 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळा महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विद्यापीठांनी मार्च महिन्यात घेण्यात येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने विद्यापीठ आणि समाजकल्याण विभागाची वसतिगृहे खाली करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. यासाठी विद्यार्थांना 20 मार्चपर्यंत वसतिगृह खाली करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. 

मुंबई, पुणे या प्रमुख शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने संशयित रुग्णांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात आणि हॉटेलांमध्ये निगराणीखाली ठेवण्यात येत आहे. संशयितांच्या वाढत्या संख्येमुळे हॉटेल आणि रुग्णालयातील जागा अपुरी पडू लागली आहे.

मोठी बातमी -  अशा लोकांना काय बोलावं; थायलंडहून परतले, अन्‌ कच्छ एक्‍स्प्रेसने केला धोकादायक प्रवास...

भविष्यातील परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सरकारने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने राज्यातील प्रमुख विद्यापीठांना पत्र पाठवून संलग्न महाविद्यालयातील आणि विद्यापीठाच्या वसतिगृहाच्या विद्यार्थी क्षमतेची माहिती मागवली आहे. 

त्यानुसार मुंबई विद्यापीठाकडे दोन मुलांची आणि दोन मुलींची वसतिगृहे आहेत. ही माहिती तातडीने राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असल्याचे विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईमध्ये समाजकल्याण विभागाची वरळी, जोगेश्वरी आणि चेंबूर येथे वसतिगृहे आहेत. ही वसतिगृहेदेखील सरकार ताब्यात घेण्याचा विचार करत असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

as precautionary measures government is planning to capture university hostels as quarantine facilities


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: as precautionary measures government is planning to capture university hostels as quarantine facilities