मुंबईत रस्ते अपघातात गरोदर मादी बिबट्याचा मृत्यू

मिलिंद तांबे
Monday, 16 November 2020

मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रस्ते अपघातात मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मीरा रोड येथील काशिमिरा परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर ही बिबट्या जखमी अवस्थेत सापडली होती.

मुंबई: मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ रस्ते अपघातात मादी बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली. मीरा रोड येथील काशिमिरा परिसरातून जाणाऱ्या महामार्गावर ही बिबट्या जखमी अवस्थेत सापडली होती. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही मादी बिबट्या गरोदर होती. 

महामार्गावरील दिल्ली दरबार उपहागृहापासून 100 मीटर अंतरावर शनिवारी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या जखमी अवस्थेत पडलेला दिसला. राष्ट्रीय उद्यान प्रशासनाला याची माहिती मिळताच वन्यजीव बचाव पथक तातडीने काशिमिरा परिसरात दाखल झाले. जखमी बिबट्याला ताब्यात घेऊन तिला राष्ट्रीय उद्यानातील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान रात्री 2.30 वाजण्याच्या सुमारास या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन यांनी दिली. महत्त्वाचे म्हणजे ही मृत बिबट्या गरोदर होती आणि तिच्या पोटात तीन अर्भक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या रस्ते अपघातात एकूण चार जीवांना आपल्या प्राणास मुकावे लागले आहे. 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त मादी बिबट्याचा अधिवास होता.

अधिक वाचा-  रायगडमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती; जिल्हा प्रशासनाचा रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा

'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'त अधिवास करणाऱ्या बिबट्यांची ओळख ठेवण्यासाठी त्यांना विशिष्ट सांकेतिक क्रमांक दिले आहेत. बिबट्यांच्या शरीरावरील वेगवेगळ्या ठिपक्यांच्या (रोजेट पॅटर्न) रचनेनुसार त्यांना  सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत. मृत मादी बिबट्याची ओळख पटली असून ती 'एल98' नामक मादी बिबट्या असल्याची माहिती राष्ट्रीय उद्यानात बिबट्यांवर संशोधन करणारे वन्यजीव संशोधक निकीत सुर्वे यांनी दिली. या बिबट्याचा अधिवास काशिमिरा परिसराला लागून असलेल्या राष्ट्रीय उद्यानाच्या जंगलात होता. यापूर्वी घोडबंदर गावात लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये तिची छायाचित्र टिपण्यात आली होती. त्यानंतर यंदा तिची छायाचित्रे महामार्गाच्या पलीकडे असलेल्या काशिमिरा परिसरात मिळाली. म्हणजे ही बिबट्या महामार्ग ओलांडत असल्याची शक्यता आहे. शनिवारी या मृत बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. वाहनाच्या जोरदार धडकेत शरीराअंतर्गत रक्तस्त्राव, फॅक्चर आणि स्नायूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बिबट्याच्या मृत्यू झाल्याचे निदान शवविच्छेदन अहवालातून समोर आल्याचे मल्लिकार्जुन यांनी सांगितले.

अधिक वाचा-  बंदी असतानाही गुटखाविक्री तेजीत; वर्षभरात तब्बल 6 कोटींचा मुद्देमाल नष्ट

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

A pregnant female leopard dies in a road accident in Mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A pregnant female leopard dies in a road accident in Mumbai