
पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील अतिदुर्गम पिंपळशेत ग्रामपंचायतीच्या हुंबरण गावातील कल्पना रावते (24) या गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना डोलीतच तिची प्रसूती झाली. उपचाराअभावी नवजात बालक दगावले. या घटनेची बातमी "सकाळ'ने "डोलीत प्रसूती, बाळाचा मृत्यू' या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी व जिल्हा परिषद बांधकाम सभापती ऍड. काशिनाथ चौधरींनी हुंबरणचा दौरा केला. तसेच अतिदुर्गम भागातील व जोखमीच्या गर्भवतींना प्राथमिक आरोग्य केंद्रातील "माहेरघरात' आणण्याचा निर्णय घेतला आहे.
मोखाडा : पालघर जिल्ह्यातील जव्हारमधील अतिदुर्गम पिंपळशेत ग्रामपंचायतीच्या हुंबरण गावातील कल्पना रावते (24) या गर्भवती महिलेला रुग्णालयात घेऊन जाताना डोलीतच तिची प्रसूती झाली. उपचाराअभावी नवजात बालक दगावले. ही घटना शुक्रवारी (ता. 27) दुपारी घडली. या घटनेची बातमी "सकाळ'ने "डोलीत प्रसूती, बाळाचा मृत्यू' या मथळ्याखाली प्रसिद्ध केली होती. या बातमीची तातडीने दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी व जिल्हा परिषद बांधकाम सभापती ऍड. काशिनाथ चौधरींनी हुंबरणचा दौरा केला. तसेच अतिदुर्गम भागातील व जोखमीच्या गर्भवतींना प्राथमिक आरोग्य केंद्रातील "माहेरघरात' आणण्याचा निर्णय घेतला आहे.
मोखाड्यातील माता व बालमृत्यूची घटना ताजी असतानाच हुंबरण गावातील कल्पना रावते या आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतिवेदना होऊ लागल्याने तिला डोली करून आणताना तिची रस्त्यातच प्रसूती झाली. तिच्या बाळाला तातडीने उपचार न मिळाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची बातमी शनिवारी (ता. 28) "सकाळ'मध्ये प्रसिद्ध होताच त्याच दिवशी पालघर जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त समितीचे सभापती ऍड. काशिनाथ चौधरी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पायपीट करत हुंबरण गावाचा दौरा केला. जव्हार, मोखाड्यातील घडलेल्या घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून अतिदुर्गम भागातील तसेच जोखमीच्या गर्भवतींचे सर्वेक्षण करून त्यांना प्रसूतीच्या एक महिना अगोदर जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील "माहेरघरा'त आणण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
"माहेरघर'चा गर्भवतींना आधार
शासनाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि मानव विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवतींना प्रसूतीसाठी इमारत बांधली आहे. या इमारतीमध्ये स्वयंपाकघर, स्वच्छतागृहासह निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्ण महिलेच्या नातेवाईकांची राहण्याची व्यवस्थादेखील येथे करण्यात आली आहे. आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी गर्भवती महिलांना वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रसूतीच्या काही काळ अधिच दुर्गम भागातील गर्भवतींना या "माहेरघरा'मध्ये ठेवण्याचा निर्णय आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
अतिदुर्गम भागातील जोखमीच्या गर्भवतींचे सर्वेक्षण करून त्यांना माहेरघरात आणणार आहोत. त्यासाठी आशा कार्यकर्तींना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच रस्ते व आरोग्य सुविधा नसलेल्या गाव-पाड्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जाईल. निधी उपलब्ध करण्यासाठी आमदारांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे.
- ऍड. काशिनाथ चौधरी, सभापती, बांधकाम व वित्त समिती, जिल्हा परिषद पालघर
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)