
गेल्या आठ महिन्यांत कोरोनाच्या प्रसारामुळे भारतातच नाही, तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : दिवाळीनंतर देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती महागात पडेल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याविषयी भीती व्यक्त केली असून, खबरदारीचे सर्व उपाय नागरिकांनी पाळण्याचे आवाहन केले आहे. गेल्या आठ महिन्यांत कोरोनाच्या प्रसारामुळे भारतातच नाही, तर संपूर्ण जगामध्ये उलथापालथ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट आली तर या आघाताने भारतातील नागरिकांचे मानसिक आरोग्य अधिक बिघडण्याची शक्यता मनोविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गेल्या आठ महिन्यांत अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले असून, यासोबतच अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे उद्योगधंदे बंद झाले असल्यामुळे नागरिक मानसिक तणावाखाली आहेत. बोरिवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहाचे मनोविकारतज्ज्ञ डॉ. प्रतीक सुरंदशे यांनी सांगितले की, कोरोना वेळीच आटोक्यात आला नाही, तर मानसिक समस्यांचा महापूर येण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. त्यातच भारतामध्ये मानसिक आजार आणि त्यांच्या समस्यांकडे केले जाणारे दुर्लक्ष पाहता वैद्यकीय क्षेत्रात तारांबळ उडेल. लॉकडाऊनमुळे शाळांमध्ये मुलांचे एकत्र न येणे, एकत्र न खेळणे, कार्यालयात सहकार्यांशी कमी झालेले संवाद, भेटीगाठी कमी झाल्यामुळे नात्यांमध्ये आलेला दुरावा, नोकऱ्यांची झालेली वाताहत याचा एकत्रित परिणाम प्रत्येकावर झाला आहे. त्यामुळे मित्र परिवारामध्ये नैराश्याची आणि आत्महत्येच्या प्रवृत्तीची लक्षणे दिसल्यास सावध व्हावे. त्यांच्या शंकांचे निरसन करून देणे काळाची गरज आहे. सरकारनेही सामाजिक-आर्थिक सुरक्षितता जाळी वाढवणे तसेच मानसिक आजारांचा सामना करणाऱ्यांना आधार देण्यासाठी आणखी काही मार्गांचा विचार करणे आवश्यक आहे.
कोरोना महामारीमुळे दहा कोटींहून अधिक लोक गरिबीच्या रेषेतून आणखी खाली जातील, अशी भीती जागतिक पातळीवर व्यक्त केली गेली आहे. आर्थिक मंदी आणि मानसिक आरोग्य समस्या पसरवण्यापासून थांबवणे ही सध्या चिंता आहे. यातून मानसिक विकार वाढण्याची भीती आहे.
- डॉ. प्रतीक सुरंदशे, मनोविकारतज्ज्ञ
---------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)