मुंबईत चिकन महागच; पाणीटंचाईमुळे पुरवठा कमी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

ग्रामीण भागातील पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या तापमानामुळे अनेक लहान पोल्ट्री फार्म बंद झाले आहेत.

मुंबई : ग्रामीण भागातील पाण्याचा तुटवडा आणि वाढत्या तापमानामुळे अनेक लहान पोल्ट्री फार्म बंद झाले आहेत. त्यातच मक्‍याचे भाव वाढल्यामुळे एक ते पाच हजार कोंबड्या पाळणाऱ्या व्यावसायिकांनी उत्पादन कमी केले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मुंबईतील पुरवठा 10 ते 15 टक्के कमी झाल्याने चिकन महागच आहे.

मुंबईत शनिवारी ब्रॉयलरचा दर 130 ते 140 रुपये किलो होता. गावठी कोंबडीसाठी किलोमागे 200 ते 210 रुपये मोजावे लागत होते. उन्हाळ्यात चिकनचे भाव 10 ते 15 रुपयांनी कमी होण्याची अपेक्षा होती; मात्र उत्पादनातच घट झाल्यामुळे पुरवठादार सांगेल ती किंमत द्यावी लागते, असे घाटकोपर येथील चिकन शॉपचे मालक संतोष बडे यांनी सांगितले. मागणीच्या तुलनेत पुरवठ्यात 10 ते 15 टक्के घट झाली आहे, असे ते म्हणाले. 

लहान व्यावसायिकांनी कोंबड्यांचे उत्पादन बंद केल्यामुळे बाजारात तुटवडा निर्माण झाला आहे, असे नॅशनल चिकन सप्लायरचे हसन कुरेशी यांनी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे कोंबड्या मरण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचा अनिष्ट परिणाम पुरवठ्यावर झाला आहे, अशी माहिती काही विक्रेत्यांनी दिली. 
कोंबड्यांच्या आहारात मक्‍याचे प्रमाण 20 टक्के असते.

मक्‍याचे भाव क्विंटलमागे 1600 ते 1700 रुपयांवरून 2300 ते 2400 रुपये झाले आहेत. त्यामुळे पोल्ट्री फार्मचालकांनी कोंबड्यांचे उत्पादनच कमी केले आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाई असल्याचाही फटका या व्यवसायाला बसला आहे, असे नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीचे मुंबई अध्यक्ष एम. बी. देसाई यांनी सांगितले. 

कोंबड्यांचा पुरवठा 

मुंबईत दररोज : अडीच ते तीन लाख 
दुष्काळामुळे घट : 25 ते 35 हजार 

मे महिन्यात भाववाढ 

थंडी संपून उन्हाळा सुरू झाल्यावर चिकनचा खप कमी होतो. त्यामुळे भाव कमी होतात; परंतु लग्नसराई सुरू झाल्यावर मागणी पुन्हा वाढते. सध्या पुरवठा कमी असल्यामुळे मे महिन्यात चिकनचे भाव आणखी वाढण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 
 

Web Title: Price of Chicken has Increased in Mumbai