टिटवाळा-आणखरमधील प्राथमिक शाळा बंद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

एकीकडे "सर्वांसाठी सक्तीचे प्राथमिक शिक्षण' हे धोरण राबवून किमान प्राथमिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शालेय शिक्षण विभाग सतत प्रयत्न करत आहे. मात्र याच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून कल्याण तालुक्‍यातील आणखर गावातील सुमारे 20 ते 30 लहान बालके वंचित झाली आहेत. आम्हाला शाळा मिळेल का शाळा? अशी आर्त हाक हे विद्यार्थी देत आहेत. 

टिटवाळा : एकीकडे "सर्वांसाठी सक्तीचे प्राथमिक शिक्षण' हे धोरण राबवून किमान प्राथमिक शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी शालेय शिक्षण विभाग सतत प्रयत्न करत आहे. मात्र याच सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून कल्याण तालुक्‍यातील आणखर गावातील सुमारे 20 ते 30 लहान बालके वंचित झाली आहेत. आम्हाला शाळा मिळेल का शाळा? अशी आर्त हाक हे विद्यार्थी देत आहेत. 

आणखर हे महसुली गाव गोवेलीपासून 2 कि.मी. अंतरावर; तर कल्याण शहरापासून 15 किमी अंतरावर आहे. गावात ये-जा करण्यासाठी ना बस, ना रिक्षा. दोन कि.मी. पायपीट केल्यानंतर गोवेली येथून वाहनांची सुविधा उपलब्ध होते. त्यामुळे ग्रामस्थांना पायपीट करूनच शहराशी संपर्क साधावा लागतो. 2018 मध्ये विद्यार्थीसंख्या कमी म्हणून तालुका पंचायत समितीच्या तत्कालीन गटशिक्षण अधिकाऱ्यांनी या गावातील प्राथमिक शाळा कायमची बंद केली.

पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्याकडे गावातील महिला दाद मागायला गेल्यावर सरकारने तुमची शाळा बंद केली आहे, आम्ही नाही केली, असे उडवाउडवीचे उत्तर देऊन आम्हाला परत पाठवल्याचे येथील पालक दर्शना हरड यांनी सांगितले. 

पहिली ते चौथीपर्यंत वर्ग असलेली शाळा बंद झाली आहे. या गावात बालवाडी नाही. अंगणवाडी तर सुरूच झाली नाही आणि गावातील शिक्षणाचे एकमेव केंद्र असणारी जिल्हा परिषद शाळा बंद झाल्यामुळे आमची मुले शिकणार कशी? असा सवाल मानसी सातपुते या महिलेने केला आहे.

प्रशासनाने शाळा बंद केल्या; मात्र शाळेची सर्व कागदपत्रे तशीच शालेय इमारतीत ठेवली आहेत. शाळेचा वापर बंद असल्याने शाळेभोवती प्रचंड गवत वाढले आहे. याबाबत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. 

सध्या गावात पहिली ते पाचवीपर्यंत शिक्षण घेणारी 20 मुले आहेत. त्यांना गावात शाळा नसल्याने पायपीट करत अन्यत्र जावे लागते. शाळा बंद झाल्याने गावातील मुलांना विविध प्रकारच्या दाखल्यासाठी प्राथमिक शिक्षकांचा दाखल लागतो, तोही यामुळे मिळत नाही. 
- चिंतामण हरड, ग्रामस्थ. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Primary school closed at Titwala-Ankhar