पंतप्रधानांचा मुंबई दौरा; महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prime Minister Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ जानेवारीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु मुंबईतील विकास प्रकल्पांच्या कामांचे उद्घाटन हेच दौऱ्याचे उदिष्ट असणार आहे.

Narendra Modi : पंतप्रधानांचा मुंबई दौरा; महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १९ जानेवारीच्या दौऱ्याच्या निमित्ताने आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु मुंबईतील विकास प्रकल्पांच्या कामांचे उद्घाटन हेच दौऱ्याचे उदिष्ट असणार आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने मुंबई शहरातील विविध विकास कामांच्या प्रकल्पाला नरेंद्र मोदी भेट देणार आहेत. त्यामध्ये मेट्रो प्रकल्पापासून ते फेरीवाल्यांना धनादेश वाटपाच्या कामाचाही समावेश आहे.

कोणत्या कामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते?

पंतप्रधानाच्या दौऱ्यातील पहिला कार्यक्रम म्हणजे एमएमआरडीएच्या अखत्यारीतील मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकेचे लोकार्पण हा कार्यक्रम असणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या २० हिंदुह्दयसम्राट बाळासाहहेब ठाकरे दवाखान्यांचे उद्घाटन यावेळी करण्यात येईल. त्यासोबतच मुंबईतील ३ मोठ्या हॉस्पिटलचा भूमीपूजन सोहळाही पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडेल. शिवाय मुंबईतील महत्वकांशी असा प्रकल्प असलेल्या ४०० किमीच्या सीसी रोडच्या कामाचेही उद्घाटन यानिमित्ताने करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाच्या पुनर्विकासाच्या कोनशिला अनावरणाचा कार्यक्रमही यानिमित्ताने पार पडणार आहे. शिवाय मुंबईतील फेरीवाल्यांसाठीच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत १० हजारांच्या धनादेशाचे वाटपही यानिमित्ताने करण्यात येईल.

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या सरकारने आतापर्यंतच्या विकास कामांची रणनिती आखली आहे. त्यामध्ये महत्वकांशी असा प्रकल्प म्हणजे ४०० किमीच्या मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटीकरण. या कामाची निविदा प्रक्रिया काही दिवसांपूर्वीच पार पडली आहे. त्यासोबतच मुंबईत २६ जानेवारीपर्यंत १०० हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू करणे हे उदिष्ट असणार आहे. तर फेरीवाल्यांच्या निमित्ताने मुंबईतील पश्चिम उपनगरातील फेरीवाले मतदार आकर्षित करणे हे सरकारचे उदिष्ट असणार आहे. त्यामुळेच फेरीवाल्यांना स्वनिधी योजनेअंतर्गत धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.

तर मुंबईच्या विकास कामांमध्ये मेट्रो मार्गिकांचे उद्घाटन तसेच सीएसएमटी स्थानकातील कोनशिलेचे अनावरण हेदेखील पंतप्रधानांच्या कार्यक्रमातील उदिष्ट असणार आहे. या कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांना आग्रह केल्याची माहिती आहे. विशेषतः फेरीवाल्यांच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या कर्ज वितरणासाठी पंतप्रधानांनी हजर रहावे यासाठी फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न केल्याची माहिती आहे.

बीकेसीत सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील विकास कामांचे उद्घाटन करून सायंकाळी बीकेसी मैदानात जंगी सभा घेणार आहेत. मुंबईतील विकास कामांच्या जोरावरच येत्या दिवसातील मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यानिमित्ताने फोडला जाणार हे पंतप्रधानांच्या दौऱ्याने स्पष्ट होत आहे. याआधीच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेवरील सत्ता थोडक्यात हुकलेल्या भाजपकडून यंदा जोरदार अशी तयारी सुरू आहे.