'प्रधानमंत्री आवास योजने'तून घर देण्याच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 जून 2018

प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपी तुकाराम लाला अडसूळ (41) या अट्टल गुन्हेगारास कळवा पोलिसांनी नवी मुंबईतील घणसोली गावातून अटक केली. 

कळवा : ठाणे पोलिस आयुक्तालय, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी यांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या नावाखाली घर देण्याच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करून त्यांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपी तुकाराम लाला अडसूळ (41) या अट्टल गुन्हेगारास कळवा पोलिसांनी नवी मुंबईतील घणसोली गावातून अटक केली. 

आरोपी अडसूळकडून 2 किलो वजनाचे सोन्याचे दागिने व लगडी असा 47 लाख 10 हजार रुपयांचा माल जप्त केल्याची माहिती बुधवार (ता. 20) कळवा पोलिस ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाणे परिमंडळ 1 चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहाययक पोलिस आयुक्त रमेश धुमाळ, कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे यानी दिली. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त दिघावकर, सह पोलिस आयुक्त मधुकर पांडे उपस्थित होते.

आरोपी तुकाराम अडसूळ प्रधानमंत्री आवास योजनेतून माझ्याकडे घर असल्याचे सर्वाना सांगून त्यांना घरं घेण्यासाठी कागदपत्रांसह संबंधित ठिकाणच्या चौकात तसेच शासकीय कार्यालयाजवळ बोलावून सदरचे लोक त्या ठिकाणी पोचल्याची खात्री करून गुन्हा करण्याच्या 'मोडस ऑपरंडी' पध्दतीने कळवा, मुंब्रा, डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, नारपोली, पालघर, वालीव ठिकाणी लोकांच्या कडून सोन्याचे दागिने जमा केले व नवी मुंबईतील कोपरखैरने येथील ज्वेलर्सकडे विकत असे. या संदर्भात ठाणे व पालघर जिल्ह्यातील 19 पोलिस ठाण्यामध्ये आरोपीवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार ठाण्याचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह, पोलिस सहआयुक्त मधुकर पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 चे डी एस स्वामी, कळवा विभाग सहाय्यक आयुक्त रमेश धुमाळ यांच्या सहकार्याने कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे व सहकारी पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी गेले काही दिवस तपास सुरू ठेवला होता.

त्यानुसार आरोपी तुकाराम अडसूळ याला कळवा पोलिसांनी घणसोली गावातून अर्जुनवाडी येथून ताब्यात घेतले व त्याने विकलेल्या 47 लाख 20 हजार 600 रुपये कोपरखैरणे येथील रमेश उर्फ राहेमसिंह, नरेश उर्फ नारायण सिंह, करणसिंह सिसोदिया यांच्या ज्वेलर्समधून मुद्देमालासह हस्तगत करण्यात आले. या पत्रकार परिषदेनंतर तक्रारदारांना पोलिस अधिकाऱ्याच्या हस्ते सन्मानपूर्वक आपले सोने वाटण्यात आले.

Web Title: the prime ministers housing scheme one arrested