पंतप्रधानांच्या साक्षीने 40 हजार कोटींचे करार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

मुंबई दौऱ्याचा मुहूर्त; रेल्वे प्रकल्पांना मिळणार ग्रीन सिग्नल
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात तब्बल 40 हजार कोटींच्या नव्या रेल्वे प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. एमयूटीपी-3 ची पायाभरणी, तर वांद्रे-विरार आणि सीएसटी-पनवेल या उन्नत रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार व मुंबई रेल्वे विकास महामंडळात सामंजस्य करारांची देवाण-घेवाण होणार आहे.

पंतप्रधान मोदी शनिवारी (ता. 24) डिसेंबरला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासह विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे करार आणि घोषणा या वेळी होणार आहे. याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-3 ची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे. 10 हजार 947 कोटींचा हा प्रकल्प आहे. यात पश्‍चिम रेल्वेवर विरार-डहाणू रोड स्थानकापर्यंत दुपदरीकरण, पनवेल ते कर्जतपर्यंत नवीन मार्ग आणि ऐरोली ते कळवा उन्नत रेल्वेमार्गाचा समावेश आहे. इतर प्रकल्पांत वांद्रे ते विरार आणि सीएसटी ते पनवेलदरम्यानच्या उन्नत रेल्वेमार्गासाठी दोन दिवसांत राज्य व मुंबई रेल्वे विकास महामंडळात सामंजस्य करार होणार आहे. त्या कराराची देवाण-घेवाण पंतप्रधानांच्या उपस्थितीत शनिवारी होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

असे आहेत प्रकल्प...
- सीएसटी-पनवेल रेल्वे उन्नत मार्ग
खर्च - 12 हजार 131 कोटी
- पनवेल-विरार मार्ग
खर्च - नऊ हजार कोटी
( केंद्रीय मंत्रिमंडळांची मंजुरी अपेक्षित)
- वांद्रे ते विरार उन्नत मार्ग
18 स्थानके
खर्च - 16 हजार 368 कोटी

Web Title: The Prime Minister's record of 40 thousand crore deal