'या' रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करता येणार नाही; आरोग्यमंत्र्यांची महत्वपुर्ण माहिती

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी रुग्णालयांना कडक शब्दात इशारा दिला आहे. आरोग्यमंत्री म्हणाले की, कोणतंही लक्षण नसलेल्या (asymptomatic) कोविड- 19च्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

मुंबई : कोरोना व्हायरसनं सर्वत्र थैमान घातलं आहे. मुंबईतही रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या वाढतीच आहे. मुंबईत कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा युद्ध पातळीवर प्रयत्न करताहेत. बुधवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खाजगी रुग्णालयांना कडक शब्दात इशारा दिला आहे. आरोग्यमंत्री म्हणाले की, कोणतंही लक्षण नसलेल्या (asymptomatic) कोविड- 19च्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मुंबईतील सर्व रुग्णालयांना कोणतंही कारण न देता पूर्ण क्षमतेनं बेड्स चालवले पाहिजेत, असं सांगितलं आहे. तसंच लोकांनीही महागड्या खासगी वाहनांवर अवलंबून न राहता केवळ सरकारी रूग्णवाहिका वापरावी असे आवाहन त्यांनी केले.

वैद्यकीय परिक्षा रद्द करा; अन्यथा आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता... वाचा सविस्तर...

खासगी रुग्णालयात 80 टक्के बेड मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे. मात्र रुग्णालयात लक्षणं नसलेल्या रुग्णांना बेड देण्यात आले तर ज्यांची परिस्थिती गंभीर आहे त्यांच्यावर अन्याय होईल. म्हणूनच, प्रत्येक रुग्णालयात नियुक्त केलेले अधिकारी असतील आणि ‘मी तुम्हाला काही मदत करू शकतो का’ असा डेस्क असेल, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. 

कोरोनाचे जे रुग्ण लक्षणविरहित आहेत त्यांना काही खासगी रुग्णालयात आयसीयू बेड्सही उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे. हे अजिबात चालणार नाही. ज्यांना खरंच आयसीयू बेडची गरज आहे त्यांनाच तो मिळाला पाहिजे. त्यातही तीव्र लक्षणे असलेले, सौम्य लक्षणे असलेले आणि लक्षणे नसलेले रुग्ण या प्राधान्यक्रमानेच बेडची उपलब्धता व्हावी, असेही टोपे यांनी नमूद केले आहे. 

MMRDA चं दुसरं कोविड रुग्णालय तयार; कोरोना रुग्णांना मिळतील 'या' सुविधा.. 

थेट प्रवेशास परवानगी दिली जाणार नाही. लक्षणं नसलेल्या रूग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करता येणार नाही आहे. केवळ खरोखरच गरजू किंवा गंभीर स्थितीत असणाऱ्यांनाच तिथेच प्रवेश दिला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

टोपे म्हणाले, खासगी किंवा ट्रस्ट रूग्णालयात रूग्णांना प्रवेश देण्यास प्राधान्य दिले जाईल. आम्ही राखीव असलेल्या सर्व 80% बेडचा वापर केल्यास, मग मुंबईत बेड्सची कमतरता भासणार नाही. 

पुढे ते म्हणाले की, लोकल बंद असल्याने वसई, नालासोपारा, विरार, कल्याण, कर्जत, कसारा या भागांतून मुंबईत येण्यास आरोग्य कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. त्याचा परिणाम रुग्णसेवेवरही दिसत होता. मात्र आता अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू झाली आहे. त्यामुळे हे कर्मचारी नियमितपणे कामावर येऊ लागले आहेत आणि आता कर्मचाऱ्यांच्या येण्याजाण्याचा प्रश्न मिटला आहे.

BIG NEWS - मुंबईतील धारावी पॅटर्न आता संपूर्ण राज्यात राबवला जाणार...

लोकल सेवाही सुरु झाली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिका हद्दीतील सर्व रुग्णालये पूर्ण क्षमतेने चालवली गेलीच पाहिजेत. त्यात कोणतीही सबब चालणार नाही, अशा कडक शब्दात आरोग्यमंत्र्यांनी इशारा दिला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: private hospitals cant take asymptomatic patients tope