खासगीत पॉझिटिव्ह अन सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह; विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? रुग्णासमोर प्रश्न

दीपक घरत
Monday, 21 September 2020

खासगी लॅबमध्ये केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हादरलेल्या रुग्णाने तासाभरातच सरकारी आरोग्य केंद्रात चाचणी केली.

 

पनवेल : खासगी लॅबमध्ये केलेली चाचणी पॉझिटिव्ह आल्याने हादरलेल्या रुग्णाने तासाभरातच सरकारी आरोग्य केंद्रात चाचणी केली. मात्र,  तेथील अहवाल निगेटिव्ह आल्याने विश्वास कोणत्या अहवालावर ठेवायचा? असा प्रश्न रुग्ण व त्याच्या नातेवाईकांना पडला आहे.

सप्टेंबरमध्ये पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; अवघ्या 21 दिवसांत 66 जणांचा मृत्यू  

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी देताना कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची वैद्यकीय चाचणी करण्याची अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील युनायटेड ब्रेव्हरीज या कारखान्यात काम करणारे पालखुर्द गावातील रवींद्र दाभणे यांनी कंपनीने सुचवलेल्या खासगी रुग्णालयातील लॅबमध्ये सोमवारी कोरोनाची चाचणी केली.  त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजताच त्यांनी वावंजे गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात चाचणी करण्याचा निर्णय घेतला. खासगी लॅबच्या अहवालानंतर तासभरातच त्यांनी सरकारी आरोग्य केंद्रात केलेल्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दाभणे मात्र संभ्रमात पडले आहेत.

22 आठवड्यांच्या गर्भवतीला गर्भपातास परवानगी नाही; वैद्यकिय अहवालाची हायकोर्टाकडून दखल

या प्रकारामुळे खासगी रुग्णालयांकडून सुरू असलेला सावळा गोंधळ उघड पडल्याचे मत स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे. घडलेल्या प्रकाराची माहिती आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.

------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Positive and Government Hospital Negative Which report to trust