दादर एसटी बसस्थानकाला खासगी ट्रॅव्हल्सचा विळखा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

खाजगी ट्रॅव्हल्स चालकांकडून कोकण, पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची पळवापळवी होत असून एसटीच्या कर्मचाऱ्यांनाही ट्रॅव्हल्सधारकांकडून दमदाटी करण्यात येत आहे.

मुंबई : दादर एसटी बस स्थानकावर खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी अतिक्रमन केले आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार 200 मिटर अंतरापर्यंत खासगी वाहतूकीच्या गाड्यांना येण्याची परवानगी नसताना देखील, खासगी ट्रॅव्हल्सकडून एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी सुरू असल्याचे दिसून येत आहे. मात्र, यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने एसटीच्या प्रवासी वाढवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरत आहेत.

दादर बस स्थानकावरून पुणे, स्वारगेट, नाशिक, कोंकण, शिर्डी, उत्तर महाराष्ट्र अशा विविध मार्गांसाठी एसटीच्या सेवा आहेत. याच ठिकाणाहून शिवनेरी आणि अश्‍वमेघ या गाड्याही धावतात. मात्र मागील काही वर्षात खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी एसटी बस स्थानकाला लागूनच आपला व्यवसाय थाटला आहे.

एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याला विरोध केल्यास खासगी चालकांकडून एसटीच्या कर्मचाऱ्यांना दमदाटी केली जात आहे. यासंदर्भात अनेक तक्रारी पोलीस ठाण्यात दिल्या असताना देखील कोणतीही कारवाई होत नसल्याचे दादर बस स्थानकातील एका एसटी कर्मचाऱ्यांने सकाळशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी ही माहिती नाव न लिहिण्याच्या अटीवर दिली आहे.

एसटी महामंडळाच्या तिकीट दरांच्या तुलनेत सुविधा देण्याचे सांगून खासगी वाहतूकदार एसटीच्या प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत. त्यामूळे सर्रास अवैध वाहतूक करत असताना देखील अद्याप कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. राज्य परिवहन विभाग, वाहतूक पोलीस विभागाकडून या अवैध वाहतूकीला आळा घातला जात नसल्याने या व्यवसायाची वाढ होत आहे. एसटीच्या छोट्या थांब्यावर सुद्धा खासगी ट्रॅव्हल्स दिसून येत असल्याने एसटीच्या सर्व कारभारांवरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ट्रॅव्हल्स एजन्सींना राजकीय वलय असते. त्यामूळे या अवैध वाहतूकदारांवर कारवाई होत नाही. परिणामी एसटीच्या कर्मचाऱ्यांना खासगी वाहतूकदारांच्या मुजोरीला सामोरे जावे लागते. एसटी प्रशासनाने यावर कठोर कारवाई करायला पाहिजे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Private Travel agencies Troubles ST Buses at Dadar Station