उत्पादन खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

राज्य सरकारने शेतमालाला दीडपट हमी भाव जाहीर केला आहे. तो केव्हा मिळणार? कृषी विभागाने याबाबतचे पंचनामे तयार करून सरकारकडे पाठवावेत. 

- प्रफुल्ल पाटील, शेतकरी नेते  

वाडा : वाडा तालुक्‍यात टोमॅटो मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोचा एका क्रेटला (30 किलो) 500 रुपये म्हणजे प्रति किलो साधारण घाऊक दर 17 रुपये होता. त्या वेळेस सर्वत्र टोमॅटोला मागणी आणि निर्यातही सुरू होती. आता निर्यातही बंद झाल्यामुळे दर्जेदार टोमॅटो क्रेटसाठी 60 रुपये म्हणजे प्रति किलो दोन रुपये; तर दुय्यम टोमॅटोला प्रति किलो एक रुपया दर मिळत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. 

वाडा तालुक्‍याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. भातशेतीनंतर येथील शेतकरी भाजीपाला, फळे व फुलांची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. वाडा तालुक्‍यातील देवघर व बुधवली या गावांतील 25 शेतकऱ्यांनी 300 एकरवर टोमॅटोची लागवड केली. मात्र, यावर्षी टोमॅटो विक्रीतून उत्पादन खर्च सोडाच; पण काढणी व वाहतुकीचाही खर्चही निघत नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. 

सरकारने टोमॅटो बांगलादेश, पाकिस्तान, दुबईला निर्यात करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील. टोमॅटो लागवडीसाठी सहकारी सेवा सोसायटीमधून आम्ही कर्ज घेतले. काढणी व वाहतूक खर्चामुळे जागेवरच 50 रुपये क्रेटचा दर पडतोय. त्यामुळे आता चार लाखांचे नुकसान कसे भरून काढायचे आणि कर्ज कसे फेडायचे, या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नसल्याने डोके भणाणलेय. 

- किशोर पाटील, टोमॅटो उत्पादक, देवघर 
 

Web Title: Production Cost will not earn by Tomato farmers tension