न्यायालयीन कामाच्यावेळी कार्यक्रम घेणार नाही

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 डिसेंबर 2016

मुंबई - न्यायालयांच्या कामकाजादरम्यान कोणताही सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम घ्यायचा नाही, असा निर्णय वकिलांच्या संघटनांनी घेतल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाच्या कामात बाधा येऊ नये, म्हणून असे संवेदनशील निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

मुंबई - न्यायालयांच्या कामकाजादरम्यान कोणताही सांस्कृतिक व अन्य कार्यक्रम घ्यायचा नाही, असा निर्णय वकिलांच्या संघटनांनी घेतल्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. न्यायालयाच्या कामात बाधा येऊ नये, म्हणून असे संवेदनशील निर्णय घेणे गरजेचे आहे, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

सोलापूर बार असोसिएशनच्या शताब्दी महोत्सवानिमित्त दोन वर्षांपूर्वी स्थानिक न्यायालयांमध्ये कार्यक्रम घेण्यात येणार होता. न्यायालयाच्या कामकाजाच्या वेळेत हा कार्यक्रम होणार असल्यामुळे न्यायाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, यामुळे या दिवशी सुटी द्यावी, अशी मागणी काही वकिलांनी उच्च न्यायालय प्रशासनाकडे केली होती; मात्र ही मागणी अमान्य करण्यात आली होती.

यासंबंधी केलेल्या याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाच्या कामाच्या वेळेत कोणताही कार्यक्रम घ्यायचा नाही, असा ठराव सोलापूर बार असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती या वेळी खंडपीठाला देण्यात आली. सुटीच्या दिवशी किंवा न्यायालयीन कामकाज नसेल अशा दिवशी असे कार्यक्रम करण्यात येतील, असे या ठरावामध्ये स्पष्ट केले आहे. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानेही याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्याचे काम सुरू केले आहे, असे खंडपीठाला सांगितले. याशिवाय न्यायालय प्रशासनानेही याबाबत महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत, असे न्यायालयाला सांगण्यात आले. याबाबत खंडपीठाने समाधान व्यक्त केले. वकिलांच्या संघटना न्यायालयाच्या कामकाजाबाबत संवेदनशील आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. याचिका दोन वर्षांपूर्वीची असल्यामुळे आणि कार्यक्रमाचा दिवस होऊन गेल्यामुळे याबाबत निरीक्षण नोंदविणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

Web Title: The program will not take judicial work