MNS : 'डीडी सह्याद्री'वर मराठीतलेच कार्यक्रम दाखवावेत! राज ठाकरेंचं दूरदर्शनला पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray_DD Sahyadri
सह्याद्री वाहिनीवर मराठीतच कार्यक्रम व्हावेत! राज ठाकरेंनी दूरदर्शनला लिहिलं पत्र

'डीडी सह्याद्री'वर मराठीतलेच कार्यक्रम दाखवावेत! राज ठाकरेंचं दूरदर्शनला पत्र

मुंबई : दूरदर्शनची मराठी वाहिनी सह्याद्री वाहिनीवर फक्त मराठी भाषेतीलच कार्यक्रम प्रसारित करण्यात यावेत, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. याबाबत राज ठाकरे यांनी दूरदर्शनला एक पत्रचं लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमासह इतर अनेक कार्यक्रमाचा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. (Programs should be in Marathi on DD Sahyadri Raj Thackeray wrote letter to Doordarshan)

राज ठाकरेंनी आपल्या पत्रात काय म्हटलंय?

राज ठाकरे म्हणतात, दूरदर्शनने (आताचे प्रसार भारती) १५ ऑगस्ट १९९४ रोजी महाराष्ट्रासाठी सह्याद्री मराठी प्रादेशिक वाहिनी सुरु केली. त्याचा उद्देश हा महाराष्ट्राच्या राज्यातील राजभाषेत म्हणजे मराठीत सर्व कार्यक्रमाचे प्रक्षेपण व्हावे हा आहे. परंतू, सध्या या वाहिनीवर अनेकदा इतर भाषेतील कार्यक्रम प्रसारित केले जात असल्याचे प्रेक्षकांच्या व आमच्या नजरेस आले आहे. याबाबत सर्व सामान्यांच्या आमच्याकडे तक्रारी आल्या आहेत. तसेच याबाबत माहिती अधिकारातूनही ही बाब उघड झाली आहे. याबाबत बातम्याही प्रसिद्ध झाल्या आहेत.

हेही वाचा: ShivSena: शिवसेना पदाधिकाऱ्यावर हल्ला; उद्धव ठाकरेंचा फोन अन् दिला 'हा' इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' हा हिंदी भाषेतील कार्यक्रम सह्याद्री तसेच दूरदर्शनच्या इतर सर्व प्रादेशिक वाहिन्यांवरून दाखवला जातो, त्याबाबत कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत. पण 'कोशिश से कामयाबी तक', 'तराने पुराने' हे हिंदी कार्यक्रम आपल्या मराठी सह्याद्री वाहिनीवर दाखवले जातात आणि ते पुनः प्रसारीतही केले जात आहेत. त्याचप्रमाणे सह्याद्री वाहिनीवरील मुलाखत किंवा संवादात्मक कार्यक्रमांमध्येही काही वेळा हिंदी वक्ते किंवा हिंदी भाषेतून संवाद साधणाऱ्या व्यक्तींना निमंत्रित केले जात असल्याचेही निदर्शनास आले आहे. हे निश्चितच मूळ उद्देशाला धरून नाही.

हेही वाचा: Video : येवल्याच्या कारागीरानं शेल्यावर साकारली फडणवीसांची प्रतिमा

आम्ही आपणांस एवढंच सांगू इच्छितो की, यशोगाथा असो, सिनेमा गीते असो, पाककृती असो वा इतर कोणताही कार्यक्रम मराठी भाषेत संवाद साधणारे असंख्य उद्योजक, कलावंत, साहित्यिक, अभिनेते आणि अगदी बल्लवाचार्यही महाराष्ट्र राज्यात आहेत. त्यामुळं मराठी भाषेत कार्यक्रम प्रसारित करण्यासाठी त्याची कमतरता नाही. याचं भान सह्याद्री वाहिनीसाठी कार्यक्रमांची निर्मिती आणि संबंधित नियोजन करणाऱ्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. याबाबत दक्षिण भारतातील कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यांतील दूरदर्शनच्या स्थानिक राजभाषाप्रेमी आणि आग्रही अशा प्रादेशिक वाहिन्यांकडून आपण योग्य तो बोध घ्यावा व सह्याद्री वाहिनीवर होणारा इतर भाषांचा प्रादुर्भाव वेळेत रोखावा. हीच एकमेव अपेक्षा. आमच्या मागणीचा आपण जरूर विचार करावा आणि योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य ती पावलं उचलेल.

Web Title: Programs Should Be In Marathi On Dd Sahyadri Raj Thackeray Wrote Letter To Doordarshan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top