
जून महिन्यापर्यंत कठोर लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या देशातील बांधकाम क्षेत्राची त्यानंतर मंदगतीने आगेकूच सुरु झाली आहे.
मुंबई ः जून महिन्यापर्यंत कठोर लॉकडाऊनचा सामना करणाऱ्या देशातील बांधकाम क्षेत्राची त्यानंतर मंदगतीने आगेकूच सुरु झाली आहे. हा वेग मंद असला तरी थोडीशीतरी प्रगती होत असल्याने व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्यामुळे मुंबईसह पुण्यात घरांची विक्री लॉकडाऊनच्या काळापेक्षा दुप्पट झाली.
फेक टीआरपी प्रकरण! रिपब्लिक टीव्हीच्या सीएफओसह पाच जणांना पोलिसांचा समन्स
मालमत्ताविषयक आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनी नाईट फ्रॅंकने सादर केलेल्या अहवालात या बाबी नमूद करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे यावर्षी मार्च ते मे या तिमाहीत निवासी जागांची विक्री चांगलीच घसरली होती, मात्र त्यानंतर विक्रीत हळूहळू वाढ होत आहे. गृहकर्जाचे घसरलेले व्याजदर, बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना दिलेल्या सवलती यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढला. रिझर्व्ह बॅंकेने कर्जफेड तहकुबी (मोरेटोरियम) जाहीर केल्यामुळे बिल्डरांनाही दिलासा मिळाला. त्यामुळे देशातील आठ प्रमुख महानगरांमध्ये एप्रिल ते जून या तिमाहीच्या तुलनेत जुलै ते सप्टेंबर या कालावधीत नव्या प्रकल्पांचे उद्घाटने साडेचार पट जास्त झाली, तर विक्रीत अडीच पट वाढ झाली.
चेन्नई, कोलकाता आणि दिल्ली महानगर क्षेत्रात मार्च ते जून तिमाहीत नगण्य विक्री झाली होती. मात्र त्यात आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सुधारणा झाली आहे. तर मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, कोलकाता येथे मागील वर्षी सरासरी विक्रीच्या निम्मी विक्री नोंदविण्यात आली. बंगळूरमध्येही या तिमाहीची विक्री गेल्यावर्षीच्या सरासरीच्या 41 टक्के होती.
व्यावसायिक जागांचे व्यवहार जेमतेमच
2014 पासून देशात सर्वसाधारण मंदीचे वातावरण असले, तरी व्यावसायिक जागांच्या व्यवहारांना त्याचा फटका बसला नव्हता. या जागांच्या विक्रीची कमान या वर्षीच्या सुरुवातीपर्यंत चढतीच होती. मात्र एप्रिल ते जून या तिमाहीत त्या व्यवहारांना मोठा फटका बसला. आता अनलॉकिंग सुरु झाले असले तरीही सोशल डिस्टन्सिंग आणि वर्क फ्रॉम होम मुळे अद्यापि कार्यालयांमध्ये तीस ते पन्नास टक्केच उपस्थिती आहे. त्यामुळे कार्यालयांचे व्यवहार सध्यातरी थंडच आहेत, मात्र त्यातही वाढ होत आहे.
चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि दिल्ली येथे 2019 च्या सरासरीच्या 40 टक्के विक्री जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत झाली. मुंबईत मात्र एप्रिल ते जून या तिमाहीत एका आयटी कंपनीचा मोठा विक्री व्यवहार झाल्याने त्या तुलनेत या तिमाहीत विक्री घटली.
-शिशीर बैजल,
अध्यक्ष, नाईट फ्रॅंक.
-----------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )