शुक्रवारी खादीचे कपडे घाला, पायात 'स्लिपर्स' चालणार नाही; सरकारी कार्यालयात 'ड्रेस कोड'

शुक्रवारी खादीचे कपडे घाला, पायात 'स्लिपर्स' चालणार नाही; सरकारी कार्यालयात 'ड्रेस कोड'

नवी मुंबई : सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट सारखे फॅन्सी कपडे घालण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. सरकारी कार्यालयात कामावर येणाऱ्या महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना सरकारने ड्रेस कोड लागू केला आहे. या ड्रेस कोडनुसार आठवड्यातुन एकदा खादीचे कपडेही घालावे लागणार आहे. 

सरकारी कार्यालयात अनेकदा विविध कामांसाठी मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आणि महत्वाचे नागरिक आदी लोकप्रतिनिधी येत असतात. या घटकांना सामोरे जाणारे कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून सुसंवाद साधत असतात. अशावेळेस कर्मचाऱ्यांनी केलेली वेशभूषा त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप भेटायला आलेल्या नागरिकांवर पडत असते. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सुसंवाद साधताना समोरील व्यक्तींवर होणाऱ्या सकारात्मक परिणामावर ही वेशभूषा अत्यंत महत्वाची असते. ही वेशभूषा सरकारी कार्यालयाला अनुरूप असणे अपेक्षित आहे.

मात्र काही कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी कार्यालयात सरकारी प्रतिनिधींना अनुरूप ठरेल असे कपडे घालत नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची जनमानसात प्रतिमा मालिन होत असल्याचे सरकारला वाटत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांकडून चांगल्या वर्तणुकीची आणि सुयोग्य व्यक्तिमत्वाची अपेक्षा सर्वसामान्य नागरिक करीत असतात. मात्र सरकारी कर्मचारी अथवा अधिकाऱ्यांचे व्यक्तिमत्व अस्वच्छ आणि चांगले नसेल तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम कामावर होतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारने मंत्रालय, सर्व राज्य सरकारची कार्यालये, महामंडळ आणि इतर सरकारी उपक्रमातील कर्मचाऱ्यांसाठी पेहराव निश्चित करणारा परिपत्रक 8 डिसेंबरला काढले आहे. या परिपत्रकानुसार कार्यालयात आलेल्या कर्मचाऱ्यांनी शोभनिय पेहराव करावा. महिला कर्मचाऱ्यांनी साडी, सलवार, चुडीदार, कुर्ता, ट्राउझर पॅन्ट किंवा त्यावर कुर्ता अथवा शर्ट तसेच आवश्यकता असल्यास ओढणी घ्यावी. पुरुष कर्मचाऱ्यांनी शर्ट, पॅन्ट आणि ट्राऊझर पॅन्ट असा पेहराव करावा. गडद रंगाचे, चित्र-विचित्र नक्षीकाम व चित्रे असलेला पेहराव परिधान करू नये. असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

कर्मचाऱ्यांनी ड्रेसकोड प्रमाणे वेशभूषा केली आहे की नाही याची शहानिशा दक्षता अधिकाऱ्यांनी घेण्याच्या जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह कंत्राटी कामगार आणि सल्लागार संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही ड्रेसकोड लागू असणार आहे. 

राज्य सरकारतर्फे खादीच्या कपड्यांना अधिक प्रोत्साहन मिळावे याकरिता लागू करण्यात आलेल्या ड्रेसकोड नुसार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी खादीचे कपडे घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे खादी कपडे उद्योगाला चालना मिळेल अशी सरकारला अपेक्षा आहे. 

पायात 'स्लिपर्स' चालणार नाही

कार्यालयात आल्यावर काही कर्मचारी पायातुन बूट काढून स्लिपर्स घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कार्यालयात येताना महिला कर्मचाऱ्यांनी चपला, बूट, सॅंडल तर पुरुष कर्मचाऱ्यांनी बूट आणि सँडलचा वापर करावा. कार्यालयात पायात स्लिपर्स वापरण्यास मनाई केली आहे.

( संपादन - सुमित बागुल )

to promote khadi government workers and officers are asked to wear khadi on every friday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com