लोकलमधील स्टंटबाजांचे प्रमाण घटले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

2019 या वर्षात अवघे 45 गुन्हे दाखल झाले असल्याने 2018 पेक्षा 2019 या वर्षात स्टंटबाजीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

ठाणे : धावत्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या स्टंटबाजाच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत घट झाली आहे. ठाणे रेल्वेस्थानक क्षेत्रात मागील तीन वर्षांत जवळपास 268 घटनांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) भारतीय रेल्वे कायद्यानुसार लोकलमध्ये स्टंट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत; तर 2019 या वर्षात अवघे 45 गुन्हे दाखल झाले असल्याने 2018 पेक्षा 2019 या वर्षात स्टंटबाजीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या कठोर कारवाया आणि जनजागृतीमुळे अशा घटना कमी झाल्याचा दावा आरपीएफने केला आहे. 

ही बातमी वाचा - बदलीसाठी शिक्षक आजारी
मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा या रेल्वे स्थानकांदरम्यान 2019 च्या डिसेंबर महिन्यात कल्याण येथील युवकाचा धावत्या लोकलमध्ये स्टंट करताना नाहक बळी गेला होता. या अनुषंगाने 2017 ते 2019 या तीन वर्षांत 268 गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली. यामध्ये 2017 मध्ये 98 गुन्हे नोंदवले गेले होते, तर 2018 मध्ये 125 गुन्ह्यांची नोंद झाली होती. दरम्यान, 2019 या वर्षभरात हे प्रमाण थेट 80 ने घसरले असून मागील वर्षात अवघे 45 गुन्हे दाखल झाले. या घटना कमी करण्यासाठी आरपीएफमार्फत कठोर कारवाई करण्याचे धोरण राबवले गेले. त्याचबरोबर अशा घटना टाळण्यासाठी रेल्वेने जनजागृतीवर विशेष भर दिल्यामुळे स्टंटबाजांची संख्या कमी झाली आहे. स्टंटबाज प्रवाशांवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. 

ही बातमी वाचा- जनजागृतीसाठी आले अन् कार्यकर्ते झाले


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The proportion of stunt people in the local area has dropped