समृद्धी महामार्गाला अजूनही मुदतवाढ नाही; एमएसआरडीसीने दिले 'हे' कारण

समीर सुर्वे
Sunday, 6 September 2020

मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी राबणारे 30 हजार कामगार लॉकडाऊन आणि पावसामुळे कमी झाले आहेत

मुंबई : मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गासाठी राबणारे 30 हजार कामगार लॉकडाऊन आणि पावसामुळे कमी झाले आहेत. मात्र, अद्याप या प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) स्पष्ट करण्यात आले.

कोरोनासोबत जगताना SMS ही त्रिसूत्री महत्त्वाची : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई-नागपूर या 701 किलोमीटर मार्गापैकी इगतपुरी ते नागपूर हा 623 किलोमीटरचा मार्ग प्रथम पूर्ण करण्यात येणार आहे. जुलै महिन्यापर्यंत नागपूर ते इगतपुरीपर्यंतचे मार्गाचे 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर चार-पाच महिन्यांनी इगतपुरी ते मुंबई पर्यंतचे काम पूर्ण होईल. सरकारला 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे. त्यामुळे नागपूर ते इगतपुरी हा टप्पा 2021च्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्च येणार असून आता 18 हजार कोटीहून अधिक खर्च झाला आहे.

कसारा घाटात 8 किलोमीटरचा बोगदा असून त्यापैकी 2 किलोमीटरचे काम झाले आहे. हा महामार्ग आठ पदरी असून त्यावर वाहानांचा वेग ताशी 150 किलोमीटरपर्यंत असणार आहे. सध्या नागपूर ते मुंबई अंतर पार करण्यासाठी 16 तासांचा कालावधी लागतो. या महामार्गामुळे हा कालावधी 8 तासांवर येणार आहे. तर मुंबई ते औरंगाबाद हे अंतर 4 तासात पूर्ण होणार आहे.

 

अहंकार जपण्यासाठी परिक्षा घेण्याचे नाटक! भाजप आमदाराची राज्यपालांकडे तक्रार

लॉकडाऊनपूर्वी या प्रकल्पासाठी तब्बल 30 हजार कामगार राबत होते. मात्र, लॉकडाऊन आणि पावसाळ्यामुळे ही संख्या निम्मी झाली आहे. मात्र, अद्याप प्रकल्पाला मुदतवाढ दिलेली नसून कंत्राटदारांकडून त्याबाबत अर्ज आल्यास निर्णय घेण्यात येईल. 
- अनिलकुमार गायकवाड,
सह संचालक, एमएसआरडीसी

 

महामार्गाची वैशिष्ट्ये :

  • - 50 हून अधिक उड्डाणपूल
  • - 24 हून अधिक इंटरचेंज
  • - 5 पेक्षा जास्त बोगदे
  • - 10 जिल्ह्यांतील 391 गावातून मार्ग जाणार
  • - इतर 14 जिल्ह्यांना फायदा होणार

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Prosperity Highway still has no extension; MSRDC gave this reason