मनोरुग्णाने घेतले ठाणे स्टेशन डोक्‍यावर!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मध्य रेल्वेने रखडपट्टीची परंपरा बुधवारी (ता. १४) सायंकाळी गर्दीच्या वेळी कायम ठेवली. ठाणे स्थानकातील खांबावर एक मनोरुग्ण चढल्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. त्याला अर्ध्या तासाने खांबावरून उतरवण्यात आले; मात्र लोकलचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत कोलमडले होते. 

मुंबई ः मध्य रेल्वेने रखडपट्टीची परंपरा बुधवारी (ता. १४) सायंकाळी गर्दीच्या वेळी कायम ठेवली. ठाणे स्थानकातील खांबावर एक मनोरुग्ण चढल्यामुळे लोकल वाहतूक ठप्प झाली. त्याला अर्ध्या तासाने खांबावरून उतरवण्यात आले; मात्र लोकलचे वेळापत्रक रात्री उशिरापर्यंत कोलमडले होते. 

बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वेस्थानकातील फलाट क्रमांक २ लगतच्या खांबावर मंगल यादव या मनोरुग्णाने चढाई केली. त्याला खांबावरून उतरवण्यासाठी ठाणे अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. त्यासाठी धीम्या "अप' आणि "डाऊन' मार्गांवरील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आल्यामुळे लोकल सेवा खोळंबली. परिणामी धीम्या मार्गावर भांडुपपर्यंत लोकलची रांग लागल्याचे सांगण्यात आले. 

ठाणे ते भांडुप स्थानकांदरम्यान किमान सात लोकल उभ्या होत्या. लोकलमधील प्रवाशांना नेमके काय झाले, हे कळत नव्हते. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वेमार्गावर उतरून चालण्यास सुरुवात केली. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरू होऊन लोकल धावू लागल्या; मात्र तोपर्यंत ठाण्यापासून पुढील स्थानकांत मोठी गर्दी झाली होती. 

लोकलमध्ये गर्दी असल्याने काही प्रवाशांनी लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करण्याचे ठरवले. त्यामुळे त्यामुळे त्या गाड्यांत ठाण्याला चढताच आले नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. प्रवाशांनी केलेल्या ट्‌विटनुसार रात्री उशिरापर्यंत लोकल एक तास उशिरा धावत होत्या. काही प्रवाशांनी तर स्थानकांत आणि पुलांवर चेंगराचेंगरी होण्याची भीतीही व्यक्त केली. 

रेल्वेवर टीका 
या घटनेमुळे समाज माध्यमांवरून रेल्वे प्रशासनावर टीका सुरू झाली. काही प्रवाशांनी घाटकोपर ते ठाणे प्रवासाला एक तास लागत असल्याचे सांगितले. रेल्वे अधिकाऱ्यांनी लोकल अर्धा तास उशिरा धावत असल्याचे मान्य केले आणि एकही लोकल रद्द करण्यात आलेली नाही, अशी माहिती दिली. एका प्रवाशाने कर्जत लोकल ठाणे स्थानकाबाहेर पाऊण तास उभी असल्याचे ट्‌विट केले. 

प्रवाशांनीच लक्ष वेधले 
ठाणे स्थानकाजवळ एक मनोरुग्ण रेल्वे खांबावर चढल्याची माहिती प्रवाशांनीच अधिकाऱ्यांना दिली. त्याला खाली उतरण्याचे आवाहन केले जात होते. तो खांबावरून उडी मारण्याची शक्‍यता असल्यामुळे दोन्ही दिशांकडील वाहतूक थांबवण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Psychiatric ascension on pillar in Thane station