ब्राह्मण महासंघातर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक सभा संपन्न

संजीत वायंगणकर
रविवार, 15 एप्रिल 2018

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अहिंसेच्या मार्गाने सामाजिक क्रांती घडवून आणणारा जागतिक महापुरूष आहे, असे प्रतिपादन भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुवर्णा रावळ यांनी डोंबिवली येथे केले.

डोंबिवली - जगभरात सामाजिक परिपर्तन होताना हिंसेचा उद्रेक होण्याची अनेक उदाहरणे आहेत परंतू  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अहिंसेच्या मार्गाने सामाजिक क्रांती घडवून आणणारा जागतिक महापुरूष आहे, असे प्रतिपादन, भटके विमुक्त परिषदेच्या अध्यक्षा, भिवंडी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. सुवर्णा रावळ यांनी डोंबिवली येथे केले. ब्राह्मण महासंघातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शैक्षणिक कार्य व राष्ट्रीय चिंतन या विषयावर श्री गणेश मंदीर पथावर आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत त्या बोलत होत्या.

प्रत्येक राष्ट्रपुरूष, संत यांना जाती-धर्माच्या परिघात ठेवण्याच्या प्रवृत्तीच्या काळात, जाती-जमाती-भाषा-वंश-पंथ-धर्म-आदिवासी-मुळनिवासी अशा विविध प्रकारे समाज विघटनाच्या चळवळींच्या युगात, सर्व राष्ट्रपुरुष हे सर्व समाजाचे आहेत हा संदेश, गणरायाच्या साक्षीने देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम सर्व समाजांना बरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, सार्वजनिक रीतीने, चौकात करणाऱ्या ब्राह्मण महासंघाचे त्यांनी कौतुक केले. त्या पुढे म्हणाल्या पूज्य बाबासाहेबांचे कार्य व विचार यांचे चिंतन झाल्यास, भिमूचा भीमराव, भीमरावांचा बाबासाहेब व बाबासाहेबांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कसा झाला याचा मागोवा घेतला पाहीजे. त्यांच्या जिवनाचे 4 कालखंड येतात, हे सांगताना त्या म्हणाल्या, पहिला कालखंड शिक्षणाचा, हिंदू समाज प्रबोधनासाठी/समाज संघटनेसाठी त्यांनी केलेल्या विविध चळवळींचा काळ, वंचित समाजाच्या आधिकारांसाठी त्यांनी केलेल्या संघर्षाचा काळ आणि संविधान निर्मीती व बौद्धधर्म दिक्षेचा काळ. या सर्व काळात शिक्षणासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, समाज प्रबोधनासाठी त्यांनी लिहिलेले अनेक ग्रंथ, आर्य बाहेरुन आले या सिद्धांताला खोटे ठरविणारे, हा देश एकाच सांस्कृतिक धाग्यात कसा बांधलेला आहे हे सिद्ध करणारे त्यांचे संशोधन, एक देश, एक चलन, एक मत, एक अधिकार, स्वधर्म स्वातंत्र्य या त्यांनी भारताला दिलेल्या देणग्या याचे सुंदर विवेचन डॉ. सुवर्णा रावळ यांनी आपल्या भाषणात केले. रूपया, शेती व्यवसाय, जलसंपदा, नदीजोड या सर्व संकल्पनांवरील बाबासाहेबांचे विचार या विषयीही त्यांनी श्रोत्यांना माहिती दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुनिल कांबळे यांनी डॉ. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या विविध शिक्षण संस्था, त्यांचे सर्व समावेशक धोरण, अनंत काणेकर, मधू दंडवते यांनी सिद्धार्थ कॉलेजात केलेले अध्यापन याबद्दल श्रोत्यांना अवगत केले. या कार्यक्रमासाठी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे राजेंद्र देवळेकर, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, माजी मंत्री जगन्नाथराव पाटील, विविध पक्षांचे नगरसेवक, रा. स्व. संघाचे कार्यकर्ते व विशाल जनसमुदाय उपस्थीत होता. सभेचे संचालन अनिकेत घमंडी यांनी केले. संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: public meeting on the occasion of Ambedkar Jayanti by Brahmin Mahasangh