जनसंपर्क अधिकारी कॅबिनमध्ये फाईलींचे घबाड

दिनेश गोगी
रविवार, 3 जून 2018

उल्हासनगर : रजेवर जाताना कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवणारे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे कॅबिन प्रशासनाने प्रथम सील केले. ते उघडल्यावर कॅबिनमध्ये तीन दिवसात महाराष्ट्र शासनाचे उप-आयुक्त दर्जाचे बोगस आयडेंटी कार्ड, काही ब्लाईंड चेक आणि विविध विभागाच्या तब्बल 387 फाईलींचे घबाड मिळून आले आहे. सुरवाती पासूनच वादग्रस्त पण भारदस्त अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या भदाणे यांच्या कॅबिनमध्ये जे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे दस्तावेज मिळाले त्यावरून भदाणेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार हे निश्चित मानले जात आहे.

उल्हासनगर : रजेवर जाताना कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवणारे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांचे कॅबिन प्रशासनाने प्रथम सील केले. ते उघडल्यावर कॅबिनमध्ये तीन दिवसात महाराष्ट्र शासनाचे उप-आयुक्त दर्जाचे बोगस आयडेंटी कार्ड, काही ब्लाईंड चेक आणि विविध विभागाच्या तब्बल 387 फाईलींचे घबाड मिळून आले आहे. सुरवाती पासूनच वादग्रस्त पण भारदस्त अशी प्रतिमा निर्माण करणाऱ्या भदाणे यांच्या कॅबिनमध्ये जे वादाच्या भोवऱ्यात सापडणारे दस्तावेज मिळाले त्यावरून भदाणेच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार हे निश्चित मानले जात आहे.

तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी भदाणे यांच्याकडे विशेष कार्य अधिकारी या अंतर्गत अतिक्रमण, पाणीपुरवठा, शिक्षण मंडळ आदी विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. मात्र हे असंवेधानिक पद असल्याच्या तक्रारी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, रिपाइं आठवले गटाचे गटनेते भगवान भालेराव, नगरसेवक मनोज लासी, वणवा समता परिषदेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी केल्यावर विद्यमान आयुक्त गणेश पाटील यांनी भदाणे यांना सर्व विभागांच्या अतिरिक्त कार्यभारातून मुक्त केले होते.

भदाणे हे नियोजित रजेनुसार 17-18 दिवस विदेशात गेले. मात्र त्यांनी त्यांच्या कॅबिनची चावी मुख्यालयात जमा करण्याऐवजी घरी ठेवली.15 दिवसांच्यावर रजेवर गेल्यावरही प्रशासनाने भदाणे यांच्या जागी दुसऱ्या कुणाकडे जनसंपर्क अधिकारी पदाचा पदभार सोपवला नाही, भदाणे यांनी कॅबिनची चावी जमा केली नसल्याने भदाणे यांच्या कॅबिनमध्ये काहीतरी घबाड असून ते गायब होण्याची शक्यता राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव, मनोज लासी यांनी केल्यावर ही कॅबिन पालिकेने सील केली. भदाणे यांच्या गैरहजेरीत ही सील केलेली कॅबिन लवाजम्यासह उघडण्यात आली.पालिकेने माजी शिवसेना नगरसेवक दिलीप मालवणकर, आरटीआय कार्यकर्ते प्रकाश तलरेजा यांना पंच ठेऊन मुख्य सुरक्षा अधिकारी बाळू नेटके यांच्या देखरेखीखाली तीन दिवस कॅबिनची झाडाझडती घेण्यात आली. त्यात 30 मे रोजी महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे उप-आयुक्त दर्जाचे बोगस आयडेंटी कार्ड, काही ब्लाईंड चेक सह अनेक वर्षापासूनच्या 128 फाईली, 31 तारखेला 133 फाईली आणि आज 2 मे रोजी 126 फाईली असे तब्बल 387 फाईलींचे घबाड सापडले असल्याने भदाणे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार हे निश्चित मानले जात आहे.

दरम्यान भदाणे यांच्यावर काही महिन्यांपूर्वी एक्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या खटल्यासाठी पालिकेने भदाणे यांना 7 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूरीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे आलाच नसल्याने तो मंजूर कसा केला. असा सवाल राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे. या मंजूरीचे स्पष्टीकरण शासनाने पालिकेकडे मागवले आहे.

दरम्यान मला राजकिय मंडळींनी पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांच्या प्रमाणे घेरले आहे. असा आरोप भदाणे यांनी केला आहे. स्वतःची तुलना बाजीप्रभू देशपांडे यांच्याशी करणारे भदाणे यांचा राजेंद्र चौधरी, भगवान भालेराव, मनोज लासी, दिलीप मालवणकर यांनी निषेध केला आहे. भदाणे यांनी माफी मागितली नाही तर काळे फासणार असा इशारा दिलीप मालवणकर यांनी दिला आहे. मी स्वतःची तुलना बाजी प्रभू देशपांडे यांच्याशी करत नाही. पावनखिंडीत बाजीप्रभू यांना कसे घेरले होते. ते केवळ उदाहरणाखातर मत व्यक्त केले. असे भदाणे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the Public Relations cabin three days, 387 files have been pending