पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प; अतिवृष्टीमुळे मंकी हिल रुळावर दरड कोसळली...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 4 August 2020

सोमवारी सकाळपासून खोपोली, खालापूर व कर्जत परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रात्री मंकी हिल पॉईंटजवळ दरड कोसळली

खोपोली : सोमवारी सकाळपासून खोपोली, खालापूर व कर्जत परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रात्री मंकी हिल पॉईंटजवळ दरड कोसळली. यामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे सेवा ठप्प झाली होती. त्यात रात्रीची वेळ असल्याने अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. प्रशासन, स्थानिक संस्था आणि तरुणांच्या मदतीने ठिकठिकाणी अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

घोडबंदरमध्ये मुसळधार पावसानं घेतला पहिला बळी, ठाण्यातही अतिवृष्टीचा इशारा

खोपोली रेल्वेस्थानकात लोकलने आलेल्या प्रवाशांची सोय करण्यासाठी खालापूरचे तहसीलदार इरेश चप्पलवार यांनी खोपोली आपत्कालीन सामाजिक ग्रुपला पाचारण मदतीचे आवाहन केले. त्यानुसार तत्काळ गुरुनाथ साठेलकर, विजय भोसले, मितेश शहा, धर्मेंद्र रावळ, अमोल कदम, अमित खिसमतराव, सुनील पुरी यांनी रेल्वेस्थानक गाठले. दरम्यान, एसटी महामंडळाच्या तीन बसेसही त्या ठिकाणी तहसीलदारांनी बोलावल्या. त्याचसोबत मिनीडोअर, रिक्षा, टेम्पो आणि लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून 300 पेक्षा जास्त प्रवाशांना पुढे पाठवण्याची सोय केली. महसूलचे अधिकारी दीपक लोते, तुराफ शेठ यांनीदेखील मदतीस हातभार लावला. तहसीलदार चप्पलवार यांच्या नेतृत्वाखाली मध्यरात्री 2.30 वाजता सुरू झालेले मदतीचे कार्य पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होते.

'ST'ला राज्य सरकारकडून पुन्हा संजिवनी देण्याचा प्रयत्न; अर्थमंत्री अजित पवारांनी दिली इतक्या कोटींची मंजूरी

फार्म हाऊसमध्येही अडकलेले 30 पर्यटक
हे कार्य संपत नाही, तोच मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास चौक गावातील आसरे या ठिकाणी काही पर्यटक सावली नावाच्या फार्म हाऊसमध्ये अडकून पडल्याचा निरोप मिळाला. खोपोली आपत्कालीन मदत करणाऱ्या ग्रुपने त्यानंतर तिकडे धाव घेतली. स्थानिक तरुणांनी पुढाकार घेत फार्म हाऊसमध्ये अडकलेल्या एकूण तीन ग्रुपमधील 30 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. त्यात सहा वर्षांचे बाळही होते. सोबत त्या फार्म हाऊसमधील दोन गाई आणि चार पाळलेले कुत्रेही बाहेर काढले. त्यानंतर स्थानिकांनी त्या सर्व पर्यटकांची पुढे जाण्याची सोय केली होती. 

मुंबईत झाड पडून दोन मुलं जखमी, ४२ ठिकाणी झाडे पडल्याच्या तक्रारी

जीते गावात कुटुंब पाण्यात
नेरळ येथील जीते गावात एक कुटुंब पाण्यात अडकून पडल्याची माहिती खोपोली अग्निशमन दलाचे प्रमुख मोहन मोरे यांनी कर्जतचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली. नदीच्या प्रवाहामुळे या कुटुंबाला चारीबाजूने पाण्याने वेढले होते. तहसीलदार कोष्टी, उपवरिष्ठ पोलिस अधिकारी अनिल घेरडीकर, पोलिस निरिक्षक अविनाश पाटील यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने कुटुंबाला घरातून बाहेर काढले.

पुरात अडकले दोन तरुण
शेलू गावातील नदीच्या पलीकडे दोन तरुण अडकल्याची माहिती मिळताच नेरुळ पोलिस, खोपोली ग्रुप, प्रशासन यंत्रणा घटनास्थळी पोहचले. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेऊन स्थानिकांकडून ग्रुपचे सदस्य पुराच्या पाण्यात उडी घेत दोन्ही तरुणांना वाचवले. 

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune-Mumbai train service disrupted; Monkey Hill rails due to heavy rains