विनयभंग करणाऱ्यांना सफाईकामाची शिक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 ऑक्टोबर 2016

मुंबई - अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी पाच तरुणांना बदलापूरमध्ये सफाईचे काम करून समाजसेवा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

मुंबई - अल्पवयीन मैत्रिणीचा विनयभंग केल्याचा गुन्हा रद्द करण्यासाठी पाच तरुणांना बदलापूरमध्ये सफाईचे काम करून समाजसेवा करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला.

सर्व आरोपी 19 ते 22 वयोगटातील आहेत. आरोपी तरुणांना बदलापूर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते काम द्यावे, काम पूर्ण झाल्यावर त्यासंबंधीचे प्रमाणपत्र द्यावे आणि या प्रमाणपत्राची प्रत संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर फौजदारी फिर्याद मागे घ्यावी, असे आदेश न्यायालयाने दिले. आरोपी भावेश म्हात्रे, आतिश भानुशंगे व अन्य तिघांनी न्यायालयात फिर्याद रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. तक्रारदार मुलगी एका मैत्रिणीसह यश नावाच्या मित्राला औषधे देण्यासाठी त्याच्या घरी गेली होती; मात्र तिने तिथे जाऊ नये म्हणून भावेश व इतर आरोपींनी मित्राच्या घरी जाऊन आक्षेपार्ह वर्तन केले आणि मारहाणही केली होती. याबाबत तक्रारदार मुलीची मैत्रीण व आईने लेखी जबाब दिला आहे; मात्र त्यानंतर आरोपींनी या प्रकाराबाबत माफी मागितली आणि तक्रार मागे घेण्याची विनंती केली. तक्रारदार मुलगी व तिच्या मैत्रिणीलाही भविष्यात पोलिस ठाणे किंवा न्यायालयात सतत जावे लागू नये, असा विचार करून त्यांच्या कुटुंबीयांनीही तक्रार मागे घेण्यास परवानगी दिली.

न्या. अभय ओक व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. आरोपींनी समाजसेवेबरोबरच प्रत्येकी 50 हजार रुपये महाराष्ट्र विधी सल्लागार केंद्राला द्यावेत, असेही न्यायालयाने म्हटले आहे. आरोपींचे वय पाहता त्यांना समाजसेवेची शिक्षा देऊन फिर्याद मागे घेण्याची परवानगी देत आहोत, असे न्यायालय म्हणाले. नोव्हेंबरमध्ये दर रविवारी दोन तास आरोपींना काम करावे लागणार आहे.

Web Title: Punishement to cleaning employee for Molestation