जांभळ्या चादरीने घडवला चमत्कार

अमित गवळे
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

दरवर्षी पावसाळा सरला की काही ठराविक शेतांमध्ये जांभळी मंजिरी फुलते. संपूर्ण शेत किंवा शेताच्या काही भागावर ही फुले पाहून जणु काही जांभळ्या रंगाची झालरच पांघरली आहे, असे वाटते.

पाली : सुधागड आणि माणगाव तालुक्‍यातील पाली-विळे मार्गावर नेणवली गावाजवळ काही शेतांमध्ये जांभळी मंजिरीच्या फुलांचा बहर आला आहे. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी निसर्गमित्र आणि पर्यटकांची येथे गर्दी होत आहे. विशेष म्हणजे सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या बहुमूल्य अशा वनस्पतीची रायगड जिल्ह्यात कुठेही शेती होत नाही. 

दरवर्षी पावसाळा सरला की काही ठराविक शेतांमध्ये जांभळी मंजिरी फुलते. संपूर्ण शेत किंवा शेताच्या काही भागावर ही फुले पाहून जणु काही जांभळ्या रंगाची झालरच पांघरली आहे, असे वाटते. अनेक प्रवासी व वाटसरू मंजिरीची झालर पाहण्यासाठी आवर्जून थांबतात. काही जण तर येथे नियमित देखील येतात. जांभळ्या मंजिरीचा हा अद्‌भुत नजारा काही दिवसच पाहायला मिळतो. फेब्रुवारीनंतर हवामानात बदल होऊ लागला की ही फुले व झुडपे सुकून जातात. त्यानंतर पुढील पुढील वर्षाची प्रतीक्षा करावी लागते. 

हे वाचा : राज ठाकरेंच्या हिंदुत्वामागे पवारांचा हात

बुटक्‍या आणि झुडुपवजा असलेल्या या झाडांची पाने हिरव्या रंगाची असतात. त्यांना आकर्षक रंगाची जांभळी फुले तुऱ्यांप्रमाणे येतात. सकाळी धुक्‍याचे दवबिंदू फुलांवर पडल्यावर ते अधिकच आकर्षक व खुलून दिसतात. 

जांभळी मंजिरी हा निसर्गाचा आविष्कार आहे. ठराविक कालावधीतच आणि विशिष्ट शेतांमध्येच ती फुललेली दिसते. पर्यावरणाच्या साखळीमध्ये तिचेही काही योगदान असू शकते. जांभळ्या मंजिरीच्या प्रजातीचे संरक्षण होणे आवश्‍यक आहे. 
- राम मुंढे, निसर्ग अभ्यासक, पाटणूस-विळे 

जांभळ्या मंजिरीची फुले खूप आकर्षक असून लक्ष वेधून घेतात. या हंगामात हमखास ही फुले पाहण्यासाठी या ठिकाणी येतो. शाळकरी मुलांनीदेखील अशा ठिकाणी भेट देणे आवश्‍यक आहे. 
- नरेश पडवळ, शिक्षक, डोंबिवली 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purple sheet in Sudhagad, Mangaon

फोटो गॅलरी