#कोविड_19 : चित्रपटगृहांमध्येही सोशल डिस्टन्सिंग

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 5 एप्रिल 2020

लॉकडाऊननंतरच्या सोशल डिस्टन्सिंगसाठी पीव्हीआर सिनेमाने महत्त्वाचा  निर्णय घेतला आहे. चित्रपटगृहांमधील आसन रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. प्रेक्षकांना आता एक आसन सोडून बसावे लागणार आहे.

मुंबई : कोरोनाबाबत खबरदारीचा उपाय म्हणून चित्रपटगृह, नाट्यगृह काही दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर चित्रपटगृहांमधील सोशल डिस्टन्सिंगसाठी पीव्हीआर सिनेमाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. परिस्थिती थोडी फार नियंत्रणात आल्यानंतर देखील चित्रपटगृह, नाट्यगृहांमध्ये काही दिवसांसाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे तितकेचे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन चित्रपटगृहांमधील आसन रचना बदलण्याचा निर्णय पीव्हीआर सिनेमाने घेतला आहे. प्रेक्षकांना आता एक आसन सोडून बसावे लागणार आहे.

हेही वाचा : अत्यावश्यक सेवेसाठी दिलासा : मालवाहतुकीकरिता ई पास

लॉकडाऊन संपल्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरु होतील. मात्र, त्यांची आसनव्यवस्था ही एकमेकांना जोडलेली असते. अशावेळी हात ठेवताना प्रेक्षकांचा एकमेकांना स्पर्शही होऊ शकतो. सध्याची परिस्थिती पाहता चित्रपटगृहांमधील आसने आणि त्याची रचना पहिल्यासारखीच ठेवली तर सोशल डिस्टंसिंग पाळता येणार नाही. त्यामुळे पीव्हीआर सिनेमाकडून आसन रचना बदलण्यात येणार असून, त्यासाठी तयारीही सुरु करण्यात आली आहे. 

महत्त्वाचे ः फळांच्या राजालाही कोरोनाचा फटका

पीव्हीआर सिनेमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम दत्ता यांनी बोलताना सांगितले, की चित्रपटगृहांची रचना बदलण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबत सध्या तयारी करत आहोत. चित्रपट पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांसोबत विशेष अंतर ठेऊन कसे बोलायचे? याबाबतचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. तसेच दोन आसनांमध्ये एका आसन एवढे अंतर असेल. पण हा बदल काही दिवसांसाठीच असेल. त्यानंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहे पहिल्यासारखीच दिसतील. प्रेक्षकांनी सोशल डिस्टन्सिंग गांभीर्याने घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

प्रेक्षक जेव्हा चित्रपटाची तिकिटे खरेदी करतील तेव्हाच चित्रपटगृहांमध्ये सोशल डिस्टन्सिंग कसे पाळावे? याबाबत त्यांना माहिती दिली जाईल. प्रेक्षकांना विशेष अंतर ठेवून बसावे लागेल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणे फार महत्त्वाचे आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 
- गौतम दत्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी, पीव्हीआर सिनेमा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PVR Cinema has made an important decision for social distancing after lockdown.