मुंबई - घरात जेवताना अजगराचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मुंबई - दहिसरच्या गटनपाडा भागात सत्यबहादूर सिंग चाळीत सोमवारी (ता. 6) मध्यरात्री एकच्या सुमारास चाळीतील घरात शिरलेल्या सहा फुटी अजगरामुळे सर्वांचीच पाचावर धारण बसली. "सार्प' या प्राणिप्रेमी संघटनेच्या सदस्यांनी अजगराला ताब्यात घेतल्यावर सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला.

चाळीच्या पहिल्या मजल्यावरील अनिल दुबे यांच्या घरात हा अनाहूत पाहुणा शिरला, त्या वेळी या कुटुंबीयांचे जेवण सुरू होते. अचानक घुसलेला अजगर पाहिल्यानंतर त्यांनी जोरजोरात ओरडायला सुरवात केली. ते ऐकून शेजारीही जमले. काही जणांनी घरातील लोकांना बाहेर काढत हाती काठी आणि बादली घेत घरात प्रवेश केला. काही केल्या अजगर बाहेर येत नसल्याचे पाहून पोलिस व अग्निशमन दलाला कळविण्यात आले. पोलिसांनी "सार्प'ला ही माहिती दिली. "सार्प'चे प्रमुख संतोष शिंदे आणि स्वयंसेवक व निसर्गतज्ज्ञ चैतन्य कीर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोवर रात्रीचे दोन वाजून गेले होते. घरात शिरताच दोघांनी 15 मिनिटांतच अजगरला पिशवीत टाकले.

"सार्प'चे चैतन्य कीर म्हणाले, 'नागरिकांनी उंदीर व घुशींचा नायनाट करावा, जेणेकरून अजगर मानवी वस्तीजवळ येणार नाही. या अजगराला पकडल्यानंतर आम्ही पोलिसांसमोरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले.''

Web Title: Python found in home