बोर्डीच्या बाजारात भाजीपाल्यात घट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

मागील काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा भासू लागला आहे.

बोर्डी : बोर्डीतील आठवडी बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे ऐन श्रावणात येथील ग्रामस्थांना भोपळी मिरची, टोमॅटो, बटाटे यांसारख्या बाहेरून आलेल्या भाज्यांवर समाधान मानावे लागले.

श्रावण महिन्यात सणावारांबरोबर व्रतवैकल्य केले जात असल्याने काही ठराविक भाज्यांना मोठी मागणी असते; मात्र परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याचा तुटवडा भासू लागला आहे. या भागात दुधी भोपळा, दोडका, चवळी, पडवळ, काकडी, कारली, तोंडली अशा वेलवर्गीय भाज्यांची मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यावर लागवड केली जाते. यातून चांगले उत्पादनही घेतले जाते.

स्थानिक बाजारपेठेत या भाज्यांना श्रावण महिन्यात तसेच गणेश उत्सव काळात मोठी मागणी असते; मात्र यंदा पावसाळी हंगाम उशिरा सुरू झाल्याने आणि त्यानंतर बेसुमार पाऊस झाल्याने वेलवर्गीय भाज्यांच्या पिकांची नासाडी झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट झाली आहे.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: quantity of Vegetable decreases in Borde market