esakal | एक हजार जणांना क्वारंटाईन केलं; कुटुंबांसहीत फिरतायेत रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

एक हजार जणांना क्वारंटाईन केलं; कुटुंबांसहीत फिरतायेत रस्त्यावर

खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत राहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील तब्बल 250 कुटुंबांतील 1000 जणांना क्वारंटाईन करण्याचे आदेश पनवेल महापालिकेतर्फे देण्यात आले. मात्र, कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ज्यांना क्वारंटाईन केले आहे, त्यांनाच माहिती नसल्यामुळे ते जवान कुटुंबांसहीत रस्त्यांवर मोकाट फिरताना दिसत आहेत. 

एक हजार जणांना क्वारंटाईन केलं; कुटुंबांसहीत फिरतायेत रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : खारघरच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत राहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील तब्बल 250 कुटुंबांतील 1000 जणांना क्वारंटाईन करण्याचे आदेश पनवेल महापालिकेतर्फे देण्यात आले; मात्र हे आदेश बजावण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्षात जवानांच्या घरी न जाता इमारतीच्या प्रवेशद्वारावरच नोटिसा वाटून वेळ मारून नेली आहे. कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ज्यांना क्वारंटाईन केले आहे, त्यांनाच माहिती नसल्यामुळे ते जवान कुटुंबांसहीत रस्त्यांवर मोकाट फिरताना दिसत आहेत. 


ही बातमी वाचली का? धक्कादायक! मुंबईत संशयितांकडून आरोग्य यंत्रणेची दिशाभूल 

आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्यरत असणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील तब्बल 11 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व जवान कळंबोली येथील रहिवासी असून त्यांच्यावर पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात तयार केलेल्या कोव्हिड- 19 विशेष रुग्णालयात आणि काही जणांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या जवानांना लागण झाल्यानंतर आणखी 148 जवानांची चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत त्यांना कोरोनाची लागण नसल्याचे निश्‍चित झाले; मात्र याआधीच्या जवानांच्या संपर्कात आलेल्या जवानांना तात्काळ क्वारंटाईन करण्याचे शहाणपण पालिकेला उशिराने सुचले आहे. 

ही बातमी वाचली का? मुंबई महापालिकेकडून डायलिसीससाठी पाच केंद्रे

त्यानुसार कळंबोलीतील जवानांसोबत विमानतळ आणि इतर कंपन्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या खारघर सेक्‍टर 36 च्या स्वप्नपूर्ती सोसायटीतील तब्बल 250 कुटुंबांना क्वारंटाईन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या कोव्हिड- 19 रुग्णालयातून काही महिला कर्मचारी स्वप्नपूर्ती सोसायटीत आल्या होत्या. सकाळीच या महिलांनी सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सोसायटीतील हौशी कलाकार मंडळींना गोळा करून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. पालिकेचे पथक पाहून बघ्यांनी प्रवेशद्वारावर एकच गर्दी केली होती. या गर्दीत जमलेल्या रहिवाशांना विचारून त्यांच्या इमारतीमधील जवानांच्या नावांच्या नोटिसांची यादी या कर्मचाऱ्यांमार्फत वाटण्यात आली. 

ही बातमी वाचली का? मुंबईतील भाजी मार्केट बंद होणार

सध्या स्वप्नपूर्ती सोसायटीतील चार हजार 500 घरांच्या सोसायटीत तीन हजारपेक्षा जास्त कुटुंबे राहत आहेत. त्यापैकी ज्या 250 कुटुंबांना क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत, त्यांना पालिकेच्या कामचुकार कर्मचाऱ्यांनी नोटीस न बजावल्यामुळे त्यांना क्वारंटाईन केल्याची माहितीच मिळालेली नाही. त्यामुळे हे संशयित जवान बिनधास्त आपल्या कुटुंबांसोबत सोसायटीच्या आवारात भाजीपाला आणण्याच्या निमित्ताने बागडताना दिसत आहेत. पालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे स्वप्नपूर्ती सोसायटीतील तब्बल तीन हजार कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. 

स्वप्नपूर्ती सोसायटीत राहणाऱ्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्याचे आदेश पनवेल महापालिकेतर्फे देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या घरी जाऊन त्यांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना देण्याचे काम कर्मचाऱ्यांनी करणे अपेक्षित आहे. तशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात येतील. 
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका.
 

loading image