"योगीजी एसआयटी चा खेळ पुरे करा"; हाथरस पोलिस कारवाईवर मुंबई काँग्रेसची तीव्र टीका

कृष्ण जोशी
Thursday, 1 October 2020

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कार प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे.

मुंबई,  ता. 1 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हाथरस बलात्कार प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये त्यांनी नेमलेल्या एसआयटी चौकशीमधून काहीही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे एसआयटी चा खेळ करण्यापेक्षा त्यांनी राजिनामा द्यावा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. 

पक्षप्रवक्ते रामकिशोर त्रिवेदी यांनी आज येथे ही मागणी केली आहे. हाथरस दौऱ्यावर निघालेले राहुल गांधी व प्रियंका गांधी यांच्यावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला असून याबाबत कारवाईची मागणीही केली आहे. 

महत्त्वाची बातमी : मुंबईतील नायर रुग्णालयात 19 जणांना दिला गेला कोविशील्ड लसीचा डोस

हाथरसच्या पिडीत मुलीला न्याय देण्याऐवजी मुख्यमंत्री योगी हे सर्व प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठीच या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे गृहमंत्रीदेखील असलेले आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशातील मुलींचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहेत, असेही प्रवक्त्यांनी म्हटले आहे.  

योगी आदित्यनाथ सत्तेवर असेपर्यंत हाथरसच्या त्या मुलीच्या मारेकऱ्यांना शिक्षा होणारच नाही.  किंबहुना एसआयटी नेमूनही तिला न्याय मिळणार नाही, त्यासाठी आदित्यनाथ यांनी राजिनामाच दिला पाहिजे. त्या मुलीच्या मारेकऱ्यांना अटक करण्याऐवजी पोलिसांनी गुपचूप तिच्यावर रात्री अंत्यसंस्कारही करून टाकले. स्वतंत्र भारताच्या इतिहासात सत्तेचा असा गैरवापर कोणीही केला नव्हता, अशी टीकाही त्रिवेदी यांनी केली. 

महत्त्वाची बातमी :  लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी बनवून द्यायचा बनावट QR कोड पास, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

यापूर्वीही जन्माष्टमीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर झालेल्या वीजकपातीसंदर्भात चौकशीसाठी योगी यांनी विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले होते. पाटीदार-मोहाबा प्रकरणीही त्यांनी एसआयटी नियुक्त केली होती. कोरोना किट घोटाळ्याची चौकशी करण्यासाठीही मुख्यमंत्र्यांनी हाच मार्ग वापरला होता. त्याचा दहा दिवसांत अहवाल अपेक्षित होता, मात्र यापैकी कशातूनही ठोस असे काहीही निष्पन्न झाले नाही, असेही प्रवक्त्यांनी दाखवून दिले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

rahul gandhi hathras police mumbi congress reaction on UP yogi government 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul gandhi hathras police mumbai congress reaction on UP yogi government