शिवसेना राहुल फाळकेच्या आत्महत्येचे प्रायश्चित करणार का? - विखे पाटील

संजय शिंदे
सोमवार, 19 मार्च 2018

नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यवसाय बुडाल्याने कराड येथील 32 वर्षीय तरूण सराफा व्यापारी राहुल राजाराम फाळके याने 16 मार्चला आत्महत्या केली होती. विखे पाटील यांनी सोमवारी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता.

मुंबई - केंद्र सरकारविरूद्ध लोकसभेत आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करून शिवसेना कराडचा शिवसैनिक राहुल फाळकेच्या आत्महत्येचे प्रायश्चित करणार का? असा प्रश्न विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज उपस्थित केला.

नोटाबंदी व जीएसटीमुळे व्यवसाय बुडाल्याने कराड येथील 32 वर्षीय तरूण सराफा व्यापारी राहुल राजाराम फाळके याने 16 मार्चला आत्महत्या केली होती. विखे पाटील यांनी सोमवारी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता. या दुर्दैवी घटनेबाबत बोलताना ते म्हणाले की, केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर 2016 रोजी केलेली नोटाबंदी आणि 1 जुलै 2017 रोजी लागू केलेला जीएसटी, या दोन निर्णयांमुळे व्यापारी उद्धवस्त झाले आहेत. केंद्र सरकारने एककल्ली, नियोजनशून्य व कोणतीही पूर्वतयारी न करता निर्णय घेतल्यामुळे राहुल फाळकेला आत्महत्या करावी लागली.

शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता आणि उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास असलेल्या या तरूण व्यापाऱ्याची ही शोकांतिका केंद्र सरकारमुळे झाली असून, शिवसेनाही केंद्रात सहभागी आहे. याचे प्रायश्चित करायचे असेल तर शिवसेनेने लोकसभेत केंद्र सरकारविरूद्ध आलेल्या अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करावे, असे विरोधी पक्षनेत्यांनी पुढे सांगितले.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे उद्ध्वस्त झालेले देशभरात असे लाखो राहुल फाळके आहेत. नोटाबंदीने शेतकरी आणि व्यापारी नाडले गेले,जीएसटीमुळे व्यापार उद्ध्वस्त झाला,याची सरकारला जाणीव आहे का?घिसाडघाईने आणि कोणतेही नियोजन न करता लागू केलेल्या या निर्णयांच्या परिणामांची जबाबदारी घेऊन सरकार नोटाबंदी पीडित आणि जीएसटीग्रस्त नागरिकांना दिलासा देणार आहे का? अशीही विचारणा यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.

Web Title: rahul phalke suicide case radhakrushna vikhe patil