खवय्यांना पोपटी नकोशी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

अफवेने खवय्यांनी कोंबडीचे मांस व अंडी या बाबी खाण्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि त्याचा परिणाम पोपटी व्यवसायावरही मोठ्या प्रमाणावर होऊन शेतात पोपटी लावून देणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 

माणगावः कोरोना विषाणूची साथ वेगाने पसरत असून, याचा परिणाम सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर पडत आहे. वाहतूक, पर्यटन, बाजार व सार्वजनिक समारंभ यावरही साथीचा परिणाम झाला आहे. विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने ग्रामीण भागातील खवय्यांच्या आवडीच्या पोपटी व्यवसायालाही साथीमुळे फटका बसला असून, थंडीच्या हंगामात खवय्यांच्या पसंतीची पोपटी नकोशी झाली आहे.

कोरोना धास्तीमुळे कामगार पळाले...
 
जिल्ह्यातील ग्रामीण भागात जानेवारी ते मार्च या महिन्यात वालाच्या शेंगांचा मोठा हंगाम असतो. शेतात तयार होणाऱ्या वालाच्या शेंगा मातीच्या मडक्‍यात विशिष्ट पद्धतीने शिजवल्या जातात. या शेंगाबरोबर अंडी, चिकन व इतर आवडीचे पदार्थ शिजवले जातात. या हंगामात अतिशय चवदार असणाऱ्या या पोपटीला शहरी व ग्रामीण भागातून चांगली मागणी आहे. या वर्षी लांबलेल्या पावसाने वालाच्या शेंगा तयार होण्यास महिन्याचा उशीर झाला होता. त्यामुळे सुरुवातीला वालाच्या शेंगांची प्रतीक्षा होती. फेब्रुवारीपासून बाजारात मोठ्या प्रमाणात वालाच्या शेंगा मिळू लागल्या आणि काही दिवसांतच जगभरात कोरोना विषाणूंची साथ पसरत असल्याचे समोर येऊ लागले. ही साथ कोंबडी, अंडी यातून पसरते. या अफवेने खवय्यांनी कोंबडीचे मांस व अंडी या बाबी खाण्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली आणि त्याचा परिणाम पोपटी व्यवसायावरही मोठ्या प्रमाणावर होऊन शेतात पोपटी लावून देणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. 

फेब्रुवारी महिन्यात पोपटी व्यवसाय जोर पकडत असतानाच कोरोनाची साथ जगभर पसरली. या साथीच्या भीतीने ग्राहकांनी पोपटी खाण्यास बंद केले आहे. याचा परिणाम या व्यवसायावर होऊन आर्थिक नुकसान होत आहे. 
- नयन पोटले, माणगाव 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-corona effect in popati party