‘व्हॅलेंटाईन डे’साठी बाजारपेठ ‘दिलदार’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

विशेष म्हणजे या वर्षीही बाजारावर प्रतीकात्मक हृदयाचेच राज्य असल्याने त्या जणू काही ‘दिलदार’ झालेल्या दिसत असून महागाई घायाळ करणारा कटाक्ष भेटवस्तूंवरही पडला आहे.

रोहा : प्रेमिकांचा दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’साठी रायगड जिल्ह्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. विशेष म्हणजे या वर्षीही बाजारावर प्रतीकात्मक हृदयाचेच राज्य असल्याने त्या जणू काही ‘दिलदार’ झालेल्या दिसत असून महागाई घायाळ करणारा कटाक्ष भेटवस्तूंवरही पडला आहे. त्यामुळे त्या १० ते १५ टक्‍क्‍यांनी महागल्या आहेत.
व्हॉट्‌सॲप, फेसबुक आदी समाजमाध्यमांवर तासन्‌ तास ‘गप्पा’ होत असल्या तरी प्रत्यक्ष भेटीची ओढ प्रत्येकालाच असतेच. त्यात १४ फेब्रुवारी, ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या प्रेमदिनाच्या निमित्ताने होत असेल तर रिकाम्या हाती जाणे शक्‍यच नाही .

हे वाचा : मुंबई - गोवा मार्गावर कार कोसळली

 प्रेमीजन त्यामुळे प्रिय व्यक्तीसाठी भेटवस्तू खरेदी करून प्रेमाचा उत्सव साजरा करतात. त्यामुळेच बाजारपेठ प्रेमाच्या रंगात न्हाऊन निघाल्या आहेत. गुलाब प्रतिकृती, इमिटेशन ज्वेलरी, मेकअप सेट, पर्स, कपडे, पर्फ्यूम, लहान-मोठ्या आकाराचे कुशन, हृदयाच्या आकाराचे बिल्ले, काचेचे शो पीस आदी वस्तू दुकानांमध्ये आहेत. त्या २५ रुपयांपासून ७०० रुपयांपर्यंत असल्याचे महावीर गिफ्टचे मालक तेजाराम चौधरी यांनी सांगितले.
धावपळीच्या आयुष्यात भावना व्यक्त करण्याचे निमित्त या दिवसामुळे मिळते, असे काही दाम्पत्यांनी सांगितले. हृदयाच्या आकाराच्या केकलासुद्धा चांगली मागणी असते, अशी माहिती ‘मिक्‍स अँड बेक केकशॉप’च्या मालक शीतल तेलंगे यांनी दिली. 

सकारात्मक बातमी : शिक्षकांची पदे भरणार

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने विविध भेटवस्तू ग्राहक खरेदी करीत आहेत. यात हृदयाच्या आकाराच्या वस्तूंचे प्रमाण अधिक आहे. निमशहरी भाग असल्याने अधिक महागड्या वस्तू विकल्या जात नाहीत. मात्र किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ टक्‍क्‍यांनी महागल्या आहेत.
- प्रांजली शिळणकर, सई गिफ्ट्‌स, रोहा

विवाहित जोडपीसुद्धा ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने एकमेकांना भेटवस्तू देतात. यात मोबाईल, आभूषण, कपडे आदी वस्तूंचा समावेश असतो.
- करुणा बढे, गृहिणी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad district are ready for Valentine's Day.