
माणगाव : तालुक्यात गेल्या ४८ तासांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. शहरातून वाहणाऱ्या काळ नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून, नदीकाठच्या लोकांना व जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे बाजारपेठ ओस पडत असल्याने दुकानदारांच्या व्यवसायावरही त्याचा परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांचा माणगाव शहराकडे येण्याचा संपर्क तुटला आहे. हा मुसळधार पाऊस असाच आणखीन दोन दिवस पुढे सुरू राहिल्यास काळ नदी धोक्याची पातळी ओलांडेल, असे वाटत असल्याने नदीकाठच्या लोकांना व जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून दिला आहे.
त्याचबरोबर पेण तालुक्याला अवकाळी पावसाने सोमवारी (ता. २६) चांगलेच झोडपून काढले. पावसामुळे सगळीकडे दाणादाण उडाली असून, शहरातील गटारे पूर्णतः तुंबल्याने रस्तावर पाणीच पाणी झाले होते. मे महिन्यात पावसाने महाराष्ट्रात हाहाकार उडवला असल्याने पहाटेपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. एकीकडे विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट या आवाजाने नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती.
पावसाचा जोर वाढतच असल्याने शहरातील अंतोरा रोड, म्हाडा कॉलनी, प्रायव्हेट हायस्कूल जवळ, कोळीवाडा, चिंचपाडा यासह इतर जागोजागी पाणी तुंबून राहिले. यामुळेच शहराची दुरवस्था दिसून येत होती, तर या अवकाळीमुळे तालुक्यातील अनेक शेतांमध्ये पाणी साचले होते, तर काही ठिकाणी लाइटचे पोल तसेच झाडे उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता.
यासह शहरातील गटारे तुंबल्याने सगळीकडे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. पेण शहरात सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटच्या अपुऱ्या कामांमुळे नागरिकांना मोठा फटका बसत असून, पाण्याचा निचरा होणे कठीण जात असल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते का काय? याचीच चिंता शेतकऱ्यांसह नागरिकांना लागून राहिली. येत्या दोन-तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार असून, नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे.
श्रीवर्धन तालुक्यात तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात पावसाची नोंद ३०७ मिमी इतकी झाली असून, यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे, तर रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.
तालुक्यात यावर्षी १५ दिवसांपासून मॉन्सूनपूर्व पावसाची रिपरिप सुरू आहे. यामुळे वातावरणात गारवा असून, पिकांना योग्य प्रमाणात उष्णता मिळत नाही. परिणामी, फळबागांचे नुकसान झाले आहे, याशिवाय पावसामुळे भात खाचरात पाणी साचल्याने पेरणीची कामे रखडली आहेत. काही ठिकाणी पेरणीपूर्व भाजणी करण्यासाठी आणलेला पालापाचोळा देखील भिजला आहे.
श्रीवर्धनला जाण्यासाठी दिवेआगर-भरडखोल-शेखाडी हा मार्ग आहे. या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू होते. त्यामुळे मूळ पूल पाडून नदी मार्गातून पर्यायी रस्ता बनवला होता, मात्र जोरदार पावसामुळे नदीमार्गातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.
नवीन पुलाचे काम अपूर्ण असून, पर्यायी रस्ता नसल्यामुळे या भागातील रहिवाशांचे मोठे हाल होत आहेत. अपुऱ्या बांधकामाचा फटका अवकाळी पावसामुळे आम्हा गावकऱ्यांना बसत आहे. शेखाडी मार्ग बंद झाल्याने दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत, असे भरडखोल येथील मनीलाल चोगले यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.