आंबिवली आरोग्य केंद्रात औषधांसाठी पैसे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

इंजेक्‍शन हवे असेल तर 20 रुपये व सलाईन लावायची असेल तर 60 रुपये असे रुग्णालयातील दर असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले. आम्ही खूप लांब राहत असल्याने येथे कमाईचे योग्य साधन नाही.

नेरळः कर्जत तालुक्‍यातील आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी सलाईन आणि इंजेक्‍शनसाठी पैसे घेत असल्याचा रुग्णांचा आरोप आहे. इंजेक्‍शन हवे असेल तर 20 रुपये व सलाईन लावायची असेल तर 60 रुपये असे रुग्णालयातील दर असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले. त्यामुळे रुग्णांची होत असलेली लूट जिल्हा परिषदेने थांबवावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

अन्यथा केडीएमटी बंद पडण्याची भीती
 
सर्वसामान्यांना उपचार मिळावेत यासाठी सरकारने जिल्हा परिषदेतून प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली आहेत. या आरोग्य केंद्रात नाममात्र नोंदणी शुल्क 10 रुपये घेऊन रुग्णावर विनामूल्य उपचार करून औषधे दिली जातात. आरोग्य केंद्रात रुग्णांकडून केस पेपरसाठी म्हणून नाममात्र 5 किंवा 10 रुपये शुल्क आकारले जातात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून सरकारने तालुक्‍यात एक ग्रामीण रुग्णालय व एक उपजिल्हा रुग्णालय आहे. त्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहे. कर्जत तालुका हा आदिवासीबहुल भाग असून, दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना विनामूल्य आरोग्य सुविधा मिळण्यासाठीचा हा एक उत्तम पर्याय जरी असला तरी जिल्हा परिषदेच्या या धोरणाला आंबिवली प्राथमिक आरोग्य केंद्रात छेद देण्यात येत आहे.

येथील आरोग्य केंद्रात पाच रुपये केस पेपरव्यतिरिक्त रुग्णांकडून सलाईन आणि इंजेक्‍शन यासाठी वेगळे पैसे घेतले जात असल्याचे उघड झाले आहे. इंजेक्‍शन हवे असेल तर 20 रुपये व सलाईन लावायची असेल तर 60 रुपये असे रुग्णालयातील दर असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले. आम्ही खूप लांब राहत असल्याने येथे कमाईचे योग्य साधन नाही. त्यामुळे खासगी दवाखाना परवडत नाही. सरकारी दुसरा दवाखाना हा कशेळे येथे आहे. याबाबत आरोग्य विभागाला विचारणा केली असता त्यांनी चक्क कानावर हात ठेवले. केंद्रातील डॉक्‍टर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील आरोग्य सभापती व उपाध्यक्ष असलेले सुधाकर घारे यांच्या तालुक्‍यातच ही लूट सुरू असल्याने चर्चांना उधाण आले आहे. 

अनेकदा आरोग्य केंद्रात औषधे नसतात. त्या वेळी औषधे का देत नाहीत म्हणून रुग्ण विचारतात. आताही दवाखान्यात खोकल्याचे कफ सिरप नाही, अनेक औषधे नाहीत. बाहेरून रुग्णांना गोळ्या, औषधे आणायला सांगितली की बाहेरून का, असे प्रश्‍न रुग्ण विचारतात. आम्ही कमी पैशात बाहेरून आणून दिली तरी आम्हाला विचारणा होते. अखेर आम्ही करायचे तरी काय? 
- डॉ. स्वप्नील बाविस्कर, वैद्यकीय अधिकारी, आंबिवली आरोग्य केंद्र 

आमची रुग्ण कल्याण समितीची बैठक झाली. त्यात सलाईन आणि इंजेक्‍शनचे पैसे घेतले असल्याच्या तक्रारींवर चर्चा झाली. त्यामुळे आता झाले; पण पुढे असे होणार नाही, अशा सूचना आम्ही संबंधितांना दिल्या आहेत. चौकशी करून संबंधितांवर कारवाई करू. 
- सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी 

आरोग्य केंद्रात सरकारकडून योग्य त्या सुविधा इतर ठिकाणी पुरवल्या जातात; मात्र आंबिवली आरोग्य केंद्रात औषधे नाहीत, असे डॉक्‍टर सांगतात. सलाईन आणि इंजेक्‍शनचे पैसे घेऊन सरकारी पगार असताना स्वतःचा व्यवसाय करतात. हा भाग संपूर्ण दुर्गम भाग आहे. अनेक आदिवासी कुटुंबांची सुरू असलेली लूट जिल्हा परिषदेने थांबवावी; अन्यथा आंदोलनाचा मार्ग आम्हाला स्वीकारावा लागेल. 
- जैतू पारधी, माजी अध्यक्ष, आदिवासी संघटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad-goverment hospital issue