कोंडरान गावात डोंगर खचला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

पावसाचा आणि येथील डोंगर खचण्याचा अभ्यास भूवैज्ञानिक विभागाने करणे आवश्‍यक आहे. कोंझर ते पाचाड हा घाटमार्ग असल्याने भविष्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो. ज्या कोंझर-कोंडरानदरम्यान डोंगर खचला आहे, तेथेही पाहणी करणे आवश्‍यक आहे.

मुंबई - महाड तालुक्‍यातील कोंडरान गावानजीक मंगळवारी (ता. 6) डोंगर खचून दगड-माती व झाडे शेकडो एकर भातशेतीत घुसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अद्याप प्रशासनाचा कोणताही अधिकारी येथे पोहचला नाही. त्यामुळे उपासमार होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. डोंगराचा भाग सुटलेल्या ठिकाणी आता धबधबा तयार झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवारी जणू ढगफुटीच झाली. काही तासांत जवळपास 380 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीने शहराला पुराने वेढले. रायगड परिसरात अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याचे दिसून येत आहे. कोंझर ते रायगडदरम्यान असलेल्या घाटात जागोजागी छोट्या-मोठ्या दरडी आल्या आहेत; मात्र कोंझर गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावरील कोंडरान गावाकडे जाणाऱ्या मार्गाच्या लगत असलेल्या भातशेतात डोंगरातून आलेल्या पाण्याने ढगफुटीचे विदारक दृश्‍य पाहण्यास मिळाले. या कोंडरान गावाच्या वरील बाजूस पाचाड गाव आहे. पाचाडमधून आलेल्या पावसाच्या पाण्याने आपला मूळ मार्ग बदलत शेजारील माती आणि त्यावरील झाडांचे तुकडे केले. डोंगर भागातून आलेल्या मातीने कोंडरान मार्गालगत शेकडो एकर भातशेतात जवळपास दीड ते दोन फूट उंचीचा माती भराव तयार झाला आहे. डोंगरातील झाडांच्या, फांद्या, साली, लाकडांचे तुकडे या भागात अडकून पडले आहेत. कोंझर गावातील गणपत रघुनाथ पवार, संजय अंबाजी पवार, शंकर बाळू सकपाळ, बाबू घोलप, विजय मगर यांचीही भातशेती असून, या भातशेतातील रोपे नष्ट झाली आहेत. पाण्याच्या प्रचंड वेगाने भातरोपे वाहून गेली आहेत. त्यातच भात जमिनीत आलेला चिखल असल्याने शेतात पाय टाकणेही शक्‍य होत नसल्याचे ग्रामस्थ अनंत पवार यांनी सांगितले. सायंकाळी 5 वाजता हे पाणी आले असून, या वेळी रस्त्यालगत असलेल्या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर किमान कमरेइतके होते, असे नामदेव जाधव यांनी सांगितले. अशी भयाण स्थिती गेल्या 50 वर्षांत कधी पहिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. अद्याप कोणताच सरकारी अधिकारी येथे पोहोचले नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. 

जमिनीची पुन्हा मशागत करणे आवाक्‍याबाहेरचे आहे. नुकसानीचा पंचमाना अद्याप झालेला नाही. भातशेतीचे नुकसान उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वेळ आली आहे. 
- गणपत पवार, ग्रामस्थ 

अभ्यास होण्याची गरज 
पावसाचा आणि येथील डोंगर खचण्याचा अभ्यास भूवैज्ञानिक विभागाने करणे आवश्‍यक आहे. कोंझर ते पाचाड हा घाटमार्ग असल्याने भविष्यात येथे धोका निर्माण होऊ शकतो. ज्या कोंझर-कोंडरानदरम्यान डोंगर खचला आहे, तेथेही पाहणी करणे आवश्‍यक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue