विशेष विद्यार्थ्यांनी साकारल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

पेण : कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये ‘सुहित जीवन ट्रस्ट’ सामाजिक संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. या गणेशमूर्ती मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुण्याबरोबरच देशभरात अनेक ठिकाणी रवाना झाल्या आहेत. 

पेण : कलेचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेणमध्ये ‘सुहित जीवन ट्रस्ट’ सामाजिक संस्थेच्या विशेष विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारल्या आहेत. या गणेशमूर्ती मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पुण्याबरोबरच देशभरात अनेक ठिकाणी रवाना झाल्या आहेत. 

सुहित जीवन ट्रस्टमध्ये आजच्या घडीला ७५ विशेष विद्यार्थी विविध व्यावसायिक शिक्षण घेत आहेत. यातील १५ ते २० विद्यार्थी गणेशमूर्ती कलेत पारंगत आहेत. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घडविण्यासाठी शाडूच्या मातीचा वापर केला जातो. या गणेशमूर्तींसाठी नैसर्गिक रंग वापरले जातात. गणेशमूर्तींसाठी लागणारा कच्चा माल मुंबई अथवा पेणमधील घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करण्यात येतो. या ट्रस्टमध्ये अर्धा फूट ते दोन फुटांपर्यंतच्या गणेशमूर्ती साकारल्या जातात.

या वर्षी देखील शेकडो पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मागणीनुसार तयार केलेल्या आहेत. उत्कृष्ट रंगसंगती व डोळ्यांची आखणीमुळे येथील गणेशमूर्तींना मागणीही मोठी आहे. ट्रस्टकडून मागणीप्रमाणेच गणेशमूर्ती तयार केल्या जात असल्याची माहिती सुहित जीवन ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील यांनी दिली.   

पेणमधील सुहित जीवन ट्रस्ट संचालित एकलव्य व्यावसायिक केंद्र १८ वर्षांवरील बौद्धिक अक्षम प्रौढ व्यक्तींसाठी कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने त्यांच्या पुनर्वसनासाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येते. व्यावसायिक प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली काथ्यापासून पायपुसणे तयार करणे, रेखीव दिवाळीचे दिवे तयार करणे, इकोफ्रेंडली पेपरपासून कापड व ज्यूटच्या बॅग तयार करणे, कृत्रिम फुले, फुलांचे गुच्छ तयार करणे, रंगीबेरंगी राख्या तयार करणे, वारली पेंटिंगचे किचन, चैत्र गुढ्या, मिरगुंड, पोहा पापड बनविण्यातही येथील विद्यार्थी पारंगत आहेत.

गेल्या वर्षी दिवाळी सणात येथील विशेष विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या दिव्यांना अटलांटा, अमेरिका येथून मागणी होती. त्या वेळी विद्यार्थ्यांनी मागणीप्रमाणे दिवे तयार केल्याची माहिती संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा डॉ. सुरेखा पाटील यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue