रायगडभूषण पुरस्काराची प्रक्रिया अपारदर्शक 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पुरस्कार कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन दिल्याचे स्पष्ट होत आहे. नाही तर एका वर्षात 336 एवढे पुरस्कार देण्याचा हेतू काय? पुरस्काराची खैरात करणे गरजेचे नव्हते. पुरस्काराची पातळी यामुळे खालावत चालली आहे. मी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. मी नक्कीच याबाबत संबंधित प्रशासनाला खुलासा करण्यास भाग पाडणार आहे.

कोलाडः रायगडभूषण पुरस्कार देताना राबविलेली प्रक्रिया पारदर्शक नाही. एका वर्षात 336 पुरस्कार देण्यामागचा नेमका उद्देश काय? हे पुरस्कार राजकीय हेतूने प्रेरित होऊन दिल्याचा आरोप तटकरे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त संदीप तटकरे यांनी केला आहे.

संदीप तटकरे यांनी याविषयी नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, रायगड भूषण पुरस्कार हा 1992 साली सुरू झाला. ज्या लोकांनी अहोरात्र कष्ट व मेहनत करून जिल्ह्यासह राज्य आणि देशात शिक्षण, कला, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात याशिवाय असे जे क्षेत्र की, ज्यामुळे संबंध रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले जाणे आवश्‍यक आहे. पुरस्काराच्या नियमावलीत राजकारण कधीच आणू नये. हे पुरस्कार कुठेतरी राजकीय हेतूने प्रेरित होऊन दिल्याचे स्पष्ट होत आहे. नाही तर एका वर्षात 336 एवढे पुरस्कार देण्याचा हेतू काय? पुरस्काराची खैरात करणे गरजेचे नव्हते. पुरस्काराची पातळी यामुळे खालावत चालली आहे. मी शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. मी नक्कीच याबाबत संबंधित प्रशासनाला खुलासा करण्यास भाग पाडणार आहे. याबाबत नेमके कारण काय, अशी विचारणा करणार आहे.

कुठलाही पुरस्कार देतो तेव्हा त्यासाठी नामांकनामधून नावाची वर्गवारी ठरवून तो व्यक्ती पात्र आहे का, याची तपासणी करणे आवश्‍यक आहे. ज्यांना रायगडभूषण पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल काही म्हणणे नाही; मात्र प्रक्रिया पारदर्शक नाही. पुरस्काराचे नियम, निकष आणि पात्रता ही सगळ्यांना समजायला पाहिजे. पात्र उमेदवाराने रायगड जिल्ह्यासाठी भरीव कामगिरी करणे आवश्‍यक आहे, असे तटकरे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raigad issue