बंदोबस्‍तात शिक्षक समुपदेशन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

अलिबाग : रत्नागिरीत झालेल्या गोंधळानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये कडेकोट बंदोबस्तात प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९० शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने मागणीनुसार शाळांमध्ये बदली केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

अलिबाग : रत्नागिरीत झालेल्या गोंधळानंतर रायगड जिल्हा परिषदेमध्ये कडेकोट बंदोबस्तात प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या ५९० शिक्षकांचे समुपदेशन करण्यात आले असून ऑनलाईन पद्धतीने मागणीनुसार शाळांमध्ये बदली केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

जिल्ह्यामध्ये १३ व १४ सप्टेंबर या कालावधीत समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली होती. सरकारचे प्रतिनिधी अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे, उपाध्यक्ष ॲड. आस्वाद पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन मंडलिक यांच्या उपस्थितीत समुपदेशन करण्यात आले. 

रत्नागिरी येथे समुपदेशनच्या वेळी गोंधळ झाला होता. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेमध्येही गोंधळ होऊ नये, समुपदेशन सुरळीत पार पडावे, यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दोन खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. समुपदेशनासाठी एकूण ६१९ शिक्षक पात्र ठरले होते. त्यापैकी फक्त ५९० शिक्षक हजर राहिले होते. उर्वरित २९ शिक्षक गैरहजर झाले. जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या २०५, आंतरजिल्हा बदलीचे ८,  नवीन भरतीतील पवित्र प्रणालीद्वारे ३७१, समायोजन व अतिरिक्त झालेले ६ अशा एकूण ५९० शिक्षकांचे समुपदेशन करून त्यांना शाळा देण्यात आल्या.

शिक्षकांची बदली व नवीन भरती प्रक्रिया वेगळी आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र ही समुपदेशन प्रक्रिया चुकीची घेण्यात आली आहे. महिला शिक्षक ज्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत, अशा असुरक्षित ठिकाणच्या शाळा त्यांना घ्याव्या लागल्या आहेत. बदली अर्जदाराच्या रिक्त शाळा समुपदेशन होईपर्यंत दाखविल्या नाहीत. 
- राजा म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, रायगड जिल्हा 

रायगड जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षकांचे समुपदेशन झाले. विस्थापित पुरुष शिक्षकांवर फार मोठा अन्याय झाला आहे. विस्थापित महिला शिक्षकांनंतर नवीन सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने बदल्या करण्यात आल्या आहेत. 
- राजेंद्र फुलवारे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ संलग्न जुनी पेन्शन संघटना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue