कचरामुक्‍तीसाठी प्लास्टिकबंदीचा जागर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

अलिबाग : रायगड जिल्हा कचरामुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपक्रम राबवले आहेत. ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ८१३ ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा घेऊन प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  

प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनावर भर देण्यासाठी ११ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर या काळात स्वच्छतेची लोकचळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. व्यापक स्वरूपात जनजागृतीसाठी उद्योजक, शैक्षणिक संस्था, सैन्य दल, पोलिस दल, सामाजिक संघटनांचे सहकार्य घेतले जात आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या आदेशानुसार मंगळवारी ८१३ ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामसभा घेऊन ठराव करण्यात आले. 

प्लास्टिक बंदीसाठी ३० सप्टेंबरला जिल्ह्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती फेरी काढण्यात येईल. प्रत्येक शाळा व परिसर प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा विविध उपक्रमांची माहिती आणि छायाचित्रे sbmzpraigad@gmail.com या ई-मेल पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांचा जिल्हा स्तरावर गौरव करण्यात येईल. या उपक्रमांचे संनियंत्रण विस्तार अधिकारी (शिक्षण) केंद्रप्रमुखांनी करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी दिल्या आहेत. प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर २० सप्टेंबरला प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये निबंध स्पर्धा होईल.

त्यासाठी ‘प्लास्टिक बंदी - काळाची गरज, ‘प्लास्टिक - गंभीर समस्या’, ‘प्लास्टिक टाळा - पर्यावरण सांभाळा’, ‘प्लास्टिकला पर्याय कापडी पिशव्या’ हे विषय देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ‘प्लास्टिकबंदी’, ‘प्लास्टिक हटवा - पर्यावरण वाचवा’, ‘प्लास्टिकचे दुष्परिणाम’ या विषयांवर २१ सप्टेंबरला वक्तृत्व स्पर्धा घेतली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue