नागोठण्‍यात प्रवास धोक्‍याचा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागोठणे : नागोठण्याजवळच्या सुकेळी परिसरातील कारखान्यांसमोरील महामार्गावर दररोज तासनतास मोठ्या संख्येने ट्रेलर, कंटेनर उभे केले जातात. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या वाहनांच्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा वाहनचालक व नागरिक व्यक्त करत आहेत. 

नागोठणे : नागोठण्याजवळच्या सुकेळी परिसरातील कारखान्यांसमोरील महामार्गावर दररोज तासनतास मोठ्या संख्येने ट्रेलर, कंटेनर उभे केले जातात. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. या वाहनांच्या चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारावा, अशी अपेक्षा वाहनचालक व नागरिक व्यक्त करत आहेत. 

ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील सुकेळी परिसरात पोलादी पाईप उत्पादन करणारे कारखाने आहेत. या कारखान्यांत कच्चा माल म्हणून पोलादी बार घेऊन आलेले ट्रेलर; तसेच उत्पादित झालेले पाईप भरण्यासाठी रिकामे ट्रेलर येत असतात. ट्रेलरचालकांना व्यवस्थापनाने दिलेल्या क्रमांकानुसार कारखान्यात सोडले जाते. तोपर्यंत हे ट्रेलर महामार्गावरच उभे केले जातात. त्याचप्रमाणे पाईप भरलेले अनेक ट्रेलरही तेथेच उभे असतात. परिणामी महामार्गावर ट्रेलर व कंटेनरच्या रांगा लागल्याचे दृश्‍य दररोज दिसते. 

वडखळ येथील एका कारखान्यातून पोलादी कॉईल भरून विळे-भागाडकडे जाणारे एका वाहतूकदाराचे ट्रेलरही अनेकदा महामार्गावरच उभे केले जातात. या ट्रेलरवरील पोलादी कॉईल रस्त्यावर पडल्यास मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त केली जाते. नियम धुडकावून महामार्गावर उभ्या केलेल्या ट्रेलर व कंटेनरकडे महामार्ग वाहतूक पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. 

कठोर कारवाईची मागणी 
मुंबई-गोवा महामार्गावर थांबलेल्या पोलादी कॉईल व पाईप भरलेल्या ट्रेलरवर रात्रीच्या वेळी दुचाकी धडकल्याच्या अनेक दुर्घटना घडल्या असून, काही जणांना जीव गमवावा लागला आहे. त्याचप्रमाणे ट्रेलर-कंटेनरच्या रांगांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते. त्यामुळे महामार्गाचा खासगी वाहनतळासारखा वापर करणाऱ्या ट्रेलर व कंटेनर चालकांवर महामार्ग वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी ऐनघर परिसरातील नागरिक व वाहनचालक करत आहेत. 

सुकेळी येथे महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रेलरवर यापूर्वीही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. संबंधित वाहतूक ठेकेदाराला पुन्हा एकदा नोटीस बजावून जवळच्या खासगी वाहनतळाचा वापर करण्याची सूचना देण्यात येईल. 
- सचिन गवळी, उपनिरीक्षक, महामार्ग वाहतूक शाखा. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue