वन्यप्राण्यांचा मोर्चा शेतीकडे

 डुकराने केलेल्‍या हल्‍ल्‍यात जखमी झालेले शेतकरी.
डुकराने केलेल्‍या हल्‍ल्‍यात जखमी झालेले शेतकरी.

अलिबाग :  जिल्ह्यात भातपीक तयार झाले आहे. त्याच्या सुगंधाने आकर्षित झालेल्या वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शिवारांकडे वळविला असून, त्यांच्याकडून पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस सुरू आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाले असून, त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शेत राखणीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर वन्यप्राण्यांकडून हल्लेही होत असल्याने दहशत निर्माण झाली आहे. मुरूड व रोहा तालुक्‍यात याचा सर्वाधिक उपद्रव आहे.

मुरूड तालुक्‍यातील शिर्घे परिसरातील वागडुंगी येथील एका शेतकऱ्यावर डुकराने हल्ला करून जखमी केले होते. त्यांना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारानंतर घरी सोडण्यात आले. अशाच प्रकारचे वन्यप्राण्यांचे हल्ले वाढले असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. फणसाड वन्यजीव अभयारण्यातील वन्यप्राणी अन्नाच्या शोधात मुरूड तालुक्‍यातील सर्वे, नांदगाव, मजगाव, रोहा तालुक्‍यातील चणेरा, सुडकोली या परिसरातील खलाटीत उतरत असतात. शेतातील पीक आता तयार झालेले असल्याने त्याच्या वासाने हे प्राणी जंगलातून येत आहेत. रात्रीच्या वेळेला शेतात शिरून पिकाचा फडशा पाडतात. त्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांनी रात्रीची राखण करण्यास सुरुवात केली आहे.

राखण करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांवर ही वन्यप्राणी अचानक हल्ला करीत असल्याने याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या या हल्ल्याची माहिती वागडुंगी ग्रामपंचायतीचे सरपंच हरी भेकरे, उपसरपंच दिवेश वरणकर यांनी वनाधिकाऱ्यांना कळवून पंचनामे करून घेतले आहेत.

वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून घेणे आवश्‍यक आहे. अनेक वेळा पंचनामे होत नसल्याने जंगलातील शेती संकटात आली आहे.
- संतोष पाटील, सरपंच, शिघ्रे ग्रामपंचायत

शेतात येणाऱ्या डुकरामुळे कुंपण कमकुवत झालेली होती. ही कुंपण घालत असताना डुकराने अचानक हल्ला केला. पहिल्या धक्‍क्‍यातच मी जमिनीवर पडलो, पुन्हा उठून उभा राहत असताना पुन्हा हल्ला केला. यामध्ये उजव्या मांडीला सुळे लागल्याने आठ टाके घालावे लागले. आरडाओरडा केल्यानंतर तो पळून गेला.
- चंद्रकांत पानगले, जखमी शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com