वृक्षतोड, तणनाशकांच्‍या वाढत्‍या वापरामुळे सुगरणीवर संक्रांत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

रोहा : एकेकाळी बोरी, बाभळी, माडाची झाडे मे महिन्यापासून सुगरणींच्या खोप्यांनी बहरत होती. पर्यायाने खोप्यांचा परिसर या पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे पक्षिप्रेमींना आकर्षित करत होता. आता हे चित्र बदलू लागले असून झपाट्याने कमी होणारे खोपे हे  जिल्ह्यात चिंतेचा विषय झाला आहे. तणनाशकांचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर, वृक्षतोड यामुळे गेल्या ५ वर्षांत यांची संख्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे.

चिमणीच्या आकाराचा सुगरण पक्षी हा सुंदर घरटे विणण्यात तरबेज असतो. त्यांची ही कलाकुसर पाहिल्यानंतर कुणालाही आश्‍चर्य वाटल्याशिवाय राहत नाही; पण रायगड जिल्ह्यात ५ वर्षांपासून जणू दृष्टच लागली आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली आहे.  तुषार पाटील या पक्षितज्ज्ञांनी या संदर्भातील नोंदी घेतल्या आहेत. त्यांनी सातत्याने या पक्ष्यांचे निरीक्षण केले. त्यांनी सांगितले की, सुगरण हा निसर्गातील कीटक, कीड नियंत्रण करणारा पक्षी आहे. तणनाशकांचा मोठ्या प्रमणात होणारा वापर, वृक्षतोड यामुळे गेल्या ५ वर्षांत यांची संख्या निम्म्याहून अधिक कमी झाली आहे. त्यामुळे त्याला संरक्षणाच्या कक्षेत आणण्याची आवश्‍यकता आहे.

काही वर्षांपूर्वी सुगरणीची घरटी गावाभोवती तळ्याच्या काठी, शेताच्या बांधावर असलेल्या बोरी, बाभळी, नारळी, ताड या झाडांवर सर्रास दिसत होती. आता ती निम्म्याने कमी झाली आहेत, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक महादेव पाटील यांनी दिली. सुगरणीचे अन्न नष्ट होत आहे. याशिवाय पाणी, हवाप्रदूषण यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे, अशी माहिती पक्षितज्ज्ञांनी दिली. अशीच परिस्थिती राहिल्यास पुढच्या पिढीला सुगारणीची घरटी बघायलाही मिळणार नाहीत, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आहे. 

गेल्या वर्षी परिसरातील वृक्षांवर सुमारे १०० सुगरण पक्षांची घरटी दिसत होती. त्यांची संख्या घटून या वर्षी ५० ते ६० पर्यंतच दिसत आहे. त्यांची संख्या निश्‍चितच 
कमी होत आहे.
- आनंद मोहिते, पक्षी निरीक्षक

गेल्या पाच वर्षांत सातत्याने सुगरण पक्षांची संख्या घटत आहे. हे पक्षी बोरी, बाभळीसारख्या काटेदार वृक्षांच्या फांदीला अडकवून घरटी बांधतात. त्या वृक्षांची संख्याही कमी होत असल्याने असे होत असावे.
- भूपेश विरले, पक्षीतज्ज्ञ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raigad Issue