डोणवतमध्ये पाण्यासाठी पायपीट

 अनियमित पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पाण्‍यासाठी पायपीट करावी लागत आहे.
अनियमित पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पाण्‍यासाठी पायपीट करावी लागत आहे.

खालापूर ः पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने डोणवत ठाकूरवाडीतील महिलांची पाण्यासाठी पायपीट वाढली आहे. ग्रामपंचायतही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने महिला संतप्त आहेत.

खालापूर तालुक्‍यातील तांबाटी ग्रामपंचायत हद्दीत डोणवत ठाकूरवाडी ५० घरांची वस्ती आहे. या ठिकाणी सध्या जुनी पाणी योजना विहिरीवर असून, पाणी नियमित मिळत नसल्याची तक्रार महिलांची आहे. नवीन टाकीचे काम सुरू असून, डोणवत धरणातून थेट पाणी पुरविण्यात येणार आहे; परंतु ते काम कासवगतीने सुरू असल्याची तक्रार वाडीतील ग्रामस्थ करतात. त्यामुळे रोजगारासाठी दिवसभर बाहेर जायचे आणि दमून आल्यावर पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट करायची यामुळे महिला संतप्त आहेत.

डोणवत ठाकूरवाडीतील महिलांना पाण्यासाठी खडतर रस्त्यातून एक किलोमीटर करावी लागत आहे. पाणी समस्येबाबत तांबाटीच्या सरपंचांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु ते प्रचारात व्यस्त असल्याने संपर्क झाला नाही.

वीजपुरवठ्यात होत असलेल्या वारंवारच्या बिघाडामुळे पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. महावितरणाकडे तक्रार केली आहे. नवीन पाण्याच्या टाकीचे कामही अंतिम टप्प्यात असून, प्लास्टर पूर्ण होत आले आहे. नवीन जलवाहिनीही टाकून झाली आहे. पाण्याची समस्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे आहे.
- प्रमोद पाटील, ग्रामसेवक, तांबाटी ग्रामपंचायत

सहा वर्षांपूर्वी पाणी योजनेच्या टाकीच्या कामास सुरुवात झाली होती; मात्र ठेकेदाराचे दुर्लक्ष होत असून, ग्रामपंचायतीचा ठेकेदारावर कोणताही धाक नसल्यामुळे या टाकीचे काम गेली सहा वर्षे अर्धवट आहे. ज्या विहिरीवरून पाणी आणावे लागते. ती विहीर गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. या विहिरीकडे जाणारा रस्ता अतिशय 
खराब आहे.
- यमुना वाघमारे, ग्रामस्थ
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com